दर्यापूर,
daryapur-market-committee : सहकार क्षेत्रात नेहमीच राजकीय केंद्रबिंदू ठरलेल्या दर्यापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी एक मोठा राजकीय भूकंप टळला. बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांच्याविरोधात विरोधी गटाने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव आवश्यक संख्याबळाअभावी बारगळला आहे. १२ संचालकांची गरज असताना प्रत्यक्ष प्रक्रियेदरम्यान एक संचालक अनुपस्थित राहिल्याने हा प्रस्ताव नामंजूर झाला. त्यामुळे सुनील गावंडे हेच सभापतीपदी कायम राहिले. या घडामोडीमुळे तालुक्याच्या सहकार व राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

तीन वर्षांपासून सभापती सुनील गावंडे हे सर्व संचालकांना सोबत घेऊन बाजार समितीचा कारभार सुरळीत चालवत होते. मात्र, ज्येष्ठ नेते सुधाकर भारसाकळे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दर्यापूरच्या राजकारणात वेगाने सूत्रे हलली. भारसाकळे यांनी आखलेल्या विशेष राजकीय रणनीतीनंतर बाजार समितीतील १२ संचालकांनी अचानक एकत्र येत सभापतींविरोधात बंड पुकारले आणि अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला. विरोधी गटातील १२ संचालकांनी स्वाक्षऱ्यांचे पत्र जिल्हा निबंधकांकडे सादर करून अविश्वास ठरावाची मागणी केली होती. ३१ जुलैला जिल्हा निबंधक राजेेश भुयार यांच्या उपस्थितीत अविश्वास प्रस्तावावरील कायदेशीर प्रक्रिया पार पडली. अविश्वास ठराव मंजूर करून सभापतींना पदावरून हटविण्यासाठी विरोधी गटाला १२ संचालकांची उपस्थिती व पाठिंबा आवश्यक होता. मात्र, प्रक्रियेच्या ऐनवेळी एक संचालक गैरहजर राहिला. त्यामुळे आवश्यक संख्याबळाची अट पूर्ण न झाल्याने जिल्हा निबंधक राजेश भुयार यांनी हा अविश्वास प्रस्ताव बारगळल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सुनील गावंडे सभापतीपदी कायम राहिले.
//दांडी मारणारा ‘तो’ कोण?
ऐनवेळी एका संचालकाने मारलेली दांडी विरोधी गटासाठी मोठा धक्का मानली जात आहे. त्यामुळे सभापती सुनील गावंडे यांनी आपले पद राखण्यात यश मिळवले. अविश्वास प्रस्ताव उधळल्याने गावंडे समर्थकांनी आनंद व्यक्त केला. अनुपस्थित राहिलेल्या त्या संचालकाबद्दल आणि भारसाकळे यांच्या फसलेल्या खेळीबद्दल राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.