‘सैराट’ फेम अरबाज शेखवर दुःखाचा डोंगर; वडिलांचे उपचारादरम्यान निधन

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
मुंबई
Arbaz Shaikh सैराट’ चित्रपटातील ‘सल्या’ या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील अस्लम शेख यांचे मेंदूशी संबंधित आजारावर उपचार सुरू असताना निधन झाले. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर विविध टप्प्यांमध्ये उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. त्यांच्या निधनामुळे शेख कुटुंबावर शोककळा पसरली असून, चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.
 

Sairat Actor Arbaz Shaikh Father Passes Away During Treatment 
मिळालेल्या माहितीनुसार, अस्लम शेख यांच्यावर सुरुवातीला सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मेंदूशी संबंधित गंभीर आजारामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. वडिलांची प्रकृती सुधारावी यासाठी अरबाज शेख सातत्याने प्रयत्न करत होता. उपचारासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी त्याने धावपळ केली होती. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत, "मला माझ्या वडिलांना वाचवायचे आहे," अशी आर्त विनंती केली होती. या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
उपचारादरम्यान अरबाज शेखने संबंधित खासगी रुग्णालयावर गंभीर आरोपही केले होते. उपचारांच्या नावाखाली रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार मोठ्या रकमेची मागणी केली जात असल्याचा दावा त्याने सोशल मीडियावरील व्हिडिओद्वारे केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची दखल घेण्यात आली होती. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने संबंधित रुग्णालयाशी संबंधित मेडिकलवर कारवाई केल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, या प्रकरणानंतर शिवसेना (शिंदे) पक्षाकडून अरबाज शेख आणि त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्यात आला. त्यानंतर अस्लम शेख यांना पुढील उपचारांसाठी दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
‘सैराट’ चित्रपटातील ‘सल्या’ ही भूमिका साकारून अरबाज शेखने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर विविध प्रकल्प आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहिला. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून वडिलांच्या प्रकृतीमुळे तो मानसिक तणावाखाली होता. वडिलांच्या उपचारांसाठी त्याने सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र अखेर उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाल्याने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.