सातारा
Satara Koyna Dam पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे आणि धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाल्याने धरणाचे सहा दरवाजे प्रत्येकी एक फूट उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या कोयना धरणातून सुमारे 5,079 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून, नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातही पाण्याची आवक वेगाने होत असून, धरणातील पाणीसाठा 84 टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढत्या जलसाठ्यामुळे वारणा धरणातून 7,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात येत आहे. या विसर्गामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
कृष्णा, कोयना आणि वारणा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्राच्या परिसरात जाणे टाळावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रात आणखी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पाण्याची आवक कायम राहिल्यास कोयना धरणाचे आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.