मुंबई
NCMC Smart Card एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना अद्याप स्मार्ट कार्ड मिळाले नसल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येते, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना एसटी प्रवासाच्या भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी यापूर्वी १ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, आता या कालावधीत आणखी एका महिन्याची वाढ करण्यात आली आहे.
शासनाच्या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १ ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली, तरी काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही.
केवळ स्मार्ट कार्ड उपलब्ध न झाल्यामुळे NCMC Smart Card पात्र प्रवाशांना शासनाच्या सवलतींपासून वंचित राहावे लागू नये, याची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एनसीएमसी स्मार्ट कार्ड अद्याप न मिळालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, पात्र प्रवाशांनी वाढीव मुदतीचा उपयोग करून एनसीएमसी स्मार्ट कार्ड मिळविण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले आहे.