नीट पेपरफुटी प्रकरणातील CJP आंदोलनावर चित्रपटाची घोषणा

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली
The Accidental Cockroach Party नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) आंदोलनाने देशभराचे लक्ष वेधून घेतले होते. या आंदोलनात देशभरातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता या चर्चित आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील आंदोलनावर चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे शीर्षक आणि अंदाजे बजेटही निश्चित करण्यात आले आहे.
 

The Accidental Cockroach Party Film Announced on CJP Protest with ₹20 Crore Budget 
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरचे गोविंद देव ‘ब्रह्मा’ यांनी दीर्घ संशोधन आणि पटकथा लेखनानंतर या चित्रपटाची घोषणा केली आहे. निर्मात्यांच्या दाव्यानुसार, या चित्रपटातून आंदोलनामागील अनेक पडद्यामागची सत्ये, राजकीय घडामोडी आणि आतापर्यंत समोर न आलेले महत्त्वाचे पैलू उलगडण्यात येणार आहेत.
जंतर मंतरवरील CJP आंदोलनामुळे देशाच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली होती. या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर तयार होणाऱ्या चित्रपटात केवळ आंदोलनाचा घटनाक्रम दाखवला जाणार नसून, त्यामागील नियोजन, पडद्यामागील राजकीय डावपेच आणि संपूर्ण घडामोडी सिनेमॅटिक पद्धतीने मांडल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या चित्रपटाचे अधिकृत शीर्षक ‘द अॅक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ (The Accidental Cockroach Party) असे निश्चित करण्यात आले आहे. या वेगळ्या आणि लक्षवेधी नावामुळे सोशल मीडियावरही या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी सुमारे २० कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे. जंतर मंतर आंदोलनाचे वातावरण, तरुणांचा सहभाग आणि संपूर्ण घटनाक्रम मोठ्या पडद्यावर वास्तवदर्शी पद्धतीने सादर करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असणार आहे.
चित्रपटातील कलाकारांची निवड, चित्रीकरणाचे वेळापत्रक आणि इतर महत्त्वाची माहिती लवकरच अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे.