yellow black fashion in vogue चित्रपटांमधील फॅशनचा प्रभाव नेहमीच तरुणाईवर दिसून आला आहे. मोठ्या पडद्यावरील कलाकारांचे वेगळे लूक आणि रंगसंगती काही दिवसांतच सर्वसामान्यांच्या वॉर्डरोबचा भाग बनतात. सध्या पिवळा आणि काळा या रंगांचे ट्विनिंग कॉम्बिनेशन जोडप्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत असून डेट नाईट, ॲनिव्हर्सरी, फोटोशूट आणि पार्टींसाठी अनेक कपल्स हा लूक पसंत करत आहेत.
फॅशन तज्ज्ञांच्या मते, पिवळा रंग आनंद, ऊर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो, तर काळा रंग आत्मविश्वास, साधेपणा आणि एलिगन्स दर्शवतो. हे दोन्ही रंग एकत्र आल्यावर आकर्षक आणि संतुलित लूक तयार होतो. त्यामुळेच हा ट्रेंड केवळ ड्रेसिंग स्टाईल न राहता प्रेम व्यक्त करण्याचा एक वेगळा अंदाज बनत आहे.
जनरेशन झेडमध्ये या रंगसंगतीची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून सोशल मीडियावरील रील्स, कपल फोटोशूट आणि फॅशन पोस्टमध्ये हा लूक सातत्याने पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही अतिरिक्त स्टायलिंगशिवाय हा रंगसंगम प्रत्येक फ्रेमला सिनेमॅटिक आणि उठावदार बनवतो.
स्टायलिस्ट तबस्सुम हक यांच्या मते, पिवळा आणि काळा रंग जवळपास प्रत्येक त्वचेच्या रंगावर आणि वयोगटातील व्यक्तींना खुलून दिसतो. उन्हाळ्यात हलका पिवळा रंग ताजेपणा देतो, तर हिवाळ्यात मोहरीच्या पिवळ्या आणि काळ्या रंगाचे कॉम्बिनेशन अधिक आकर्षक वाटते. त्यामुळे हा ट्रेंड प्रत्येक ऋतूत सहज स्वीकारता येतो.