आधुनिक पेरणी पद्धतीला पसंती
वाशीम,
aadhunik perani paddhati यावर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात बहुतांश भागात शेतकर्यांनी पुन्हा एकदा सोयाबीन पिकालाच प्राधान्य दिले आहे. बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि उत्पादन खर्चाचा विचार करता सोयाबीनची लागवड वाढत असताना, पेरणीसाठी टोकन यंत्राचा वापरही वाढल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाचे स्वरूप अद्यापही अनिश्चित आहे. अशा परिस्थितीत शेतात पाणी साचू नये, अतिरिक्त ओलाव्याचा फटका बसू नये आणि मुळांची वाढ चांगली व्हावी यासाठी अनेक शेतकरी आधुनिक पेरणी पद्धती स्वीकारत आहेत. त्यामध्ये टोकन यंत्राद्वारे तसेच रुंद वाफा-सरी पद्धतीने पेरणी करण्याकडे कल वाढला आहे. संशोधनातूनही या पद्धतीमुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होऊन ओलावा संवर्धन, चांगली उगवण आणि उत्पादनात वाढ होत असल्याचे निष्कर्ष नोंदविले गेले आहेत. कृषीतज्ज्ञांच्या मते, टोकन यंत्रामुळे प्रत्येक बियाणे ठराविक अंतरावर पडत असल्याने झाडांची योग्य संख्या राखली जाते. बीजदर कमी लागतो, खुरपणी व तणनियंत्रण सुलभ होते, तसेच खत व्यवस्थापनही अधिक परिणामकारक ठरते. परिणामी उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होण्यास मदत मिळते.
टोकन यंत्राचे प्रमुख फायदे
बियाण्याची १५ ते २५ टक्कयांपर्यंत बचत होते. प्रत्येक रोपाला योग्य वाढीसाठी आवश्यक अंतर, अतिरिक्त पावसात पाणी साचण्याचा धोका कमी, तणनियंत्रण व आंतरमशागतीची कामे सुलभ होते. तसेच उत्पादन खर्चात बचत आणि अधिक उत्पादनाची शक्यता वाढते.