पावसाने ओलांडली सरासरी

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
- पुजारीटोला प्रकल्पाचे ६ गेट उघडले
- सालेकसा तालुक्यात अतिवृष्टी

गोंदिया, 
Pujaritola Project जिल्ह्यात ३० जून ते ५ जुलै याच सहा दिवसांच्या कालावधीत दमदार पावसाने हजेरी लावली असून आतापर्यंत जिल्ह्यात २६८.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी, जिल्ह्यातील नदी नाले ओसांडून वाहत असताना धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. दरम्यान, पुजारीटोला धरणाचे सहा गेट ०.३ मिटरने उघण्यात आले आहे. जिल्ह्यात १ जून ते ५ जुलै दरम्यान सरासरीच्या २५९.७ मिमी पाऊस पडतो. तर यंदा याच कालावधीत २६८.६ मिमी पावसाची नोंद झाली. त्याची टक्केवारी १०३.४ टक्के इतकी आहे.
 
 
pujari
 
गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर रविवारीही सकाळपासून कायम होता. पावसाने नदी नाले सुद्धा भरून वाहत असून, पेरणी आणि रोवणीच्या कामाला वेग आला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात २८.२ मिमी पाऊस झाला असताना सालेकसा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. दिवसर दमदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सलग झालेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून गोरेगाव ते म्हसगाव मार्गावरील पांगोली नदीला पूर आल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणाच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. पुजारीटोला धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या २५ गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला.
 
 
गुरांचा गोठा कोसळला, झाडेही पडली
गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथील शालिक कावळे व सोनी येथील गुणेश्वर बळीराम मेश्राम यांच्या मालकीचा गुरांचा गोठा कोसळला. त्यामुळे त्यांचे हजारो रूपयाचे नुकसान झाले आहे.