Murder नागपूर ग्रामीण पोलिसांनी विकसित केलेल्या 'मार्वल-एआय' या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणालीच्या मदतीने अज्ञात वृद्ध महिलेवरील बलात्कार व हत्येचा गुन्हा नऊ दिवसांत उघडकीस आणण्यात यश मिळाल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. सुधाकर दादाराव मंडपे (४८) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मंडपेने केलेला हा पहिला बलात्कार नाही. २० वर्षांपूर्वी त्याच्यावर कळमेश्वर हद्दीत अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल आहे.
पाटणसावंगी शिवारात २७ जूनला एका अनोळखी महिलेचा निर्जनस्थळी मृतदेह आढळला होता. तिच्या शरिरावर एकही कपडा नव्हता. मृत आढळलेल्या या महिलेचा चेहरा विद्रूप झाला होता. त्यामुळे पोलिसांपुढे महिलेची ओळख पटवण्यापासून तिच्या खुनाचा गुंता उलगडण्याचे आव्हान होते. घटनास्थळी पुरावा म्हणून चिप्सच्या पुड्याचा फक्त एक तुकडा होता. त्या व्यतिरिक्त कुठलाही पुरावा नव्हता. मृतावस्थेत आढळलेल्या महिलेवर आधी बलात्कार झाल्याचा निष्कर्ष शवविच्छेदन अहवालातून नोंदवला होता. पोलिसांनी त्रिमितीय पद्धतीने महिलेच्या विद्रुप चेहऱ्याचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने रेखाटन केले. तो फोटो पाहून सामाजिक कार्यकर्त्याने महिलेला पाटणसावंगी ते खापरखेडा मार्गावर पाहिल्याचे सांगितले. दरम्यान पथकाने घटनास्थळी पडलेल्या चिप्स पुड्याच्या पाकिटावरून वितरकाला चौकशीसाठी पाचारण केले. वितरकाने हे चिप्स दहेगाव ते खापरखेडा मार्गावर विक्री होत असल्याचे सांगितले. त्या आधारे ५०० सीसीटीव्ही तपासताना एकावर संशय आला. हाच धागा खुनाचा गुंता उलडण्यात मोलाचा ठरला.
संशयिताचा फोटोने फुटले बींग
दहेगाव बसस्थानकाशेजारील सीसीटीव्हीत दिसलेल्या मंडपेचा चेहरा अंधूक होता. ग्रामीण पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चेहरा तयार केला. त्या आधारे १५ किलोमिटरच्या परिघात शोध घेतला असता तो बोखाराजवळील श्रीकृष्ण नगरात आढळलेल्या सुधाकर मंडपेच्या चेहऱ्याशी तंतोतंत जुळला. ताब्यात घेऊन चौकशी करताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली.