- शैक्षणिक साहित्याचेही होणार वाटप
अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur Prison कारागृहातील शिक्षा भोगणाऱ्या बंद्यांचे कुटुंबाशी भावनिक नाते अधिक दृढ व्हावे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने नागपूर मध्यवर्ती कारागृहात ११ जुलै रोजी 'गळाभेट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात बंद्यांच्या १८ वर्षांखालील मुला-मुली, नातवंडे तसेच भाऊ-बहिणींना प्रत्यक्ष भेटीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी साहित्याचेही वितरण करण्यात येणार आहे.
कारागृह व सुधारसेवा विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. ए. आयचित उपस्थित राहणार आहेत. कारागृह अधीक्षक वैभव आगे आणि दीपा आगे यांच्या नियोजनातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर बंद्यांना समाजात सन्मानाने पुनर्वसनाची संधी मिळावी, कुटुंबाशी आपुलकीचे संबंध कायम राहावेत आणि दीर्घकाळ दूर राहिल्याने निर्माण होणारी भावनिक दरी कमी व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांना आई-वडिलांची प्रत्यक्ष भेट झाल्यास त्यांच्या मानसिक आधाराला बळ मिळण्यास मदत होते, असा कारागृह विभागाचा विश्वास आहे. याचबरोबर, कारागृहात असलेल्या बंद्यांच्या कुटुंबातील कमावती व्यक्ती अनुपस्थित असल्यामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी नागपूर हाऊसेस ऑफ मेरी इमॅक्युलेट संस्था आणि प्रयास-टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. कारागृह विभागाच्या 'सुधारणा आणि पुनर्वसन' या संकल्पनेला बळकटी देणारा हा उपक्रम समाज आणि बंदी यांच्या नात्यातील दरी कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.