वॉशिंग्टन,
Questions about Ronaldo's performance 'फिफा' विश्वचषक २०२६ मध्ये पोर्तुगालचे आव्हान स्पेनविरुद्धच्या उप-उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतर संपुष्टात आले. ०-१ अशा निकालामुळे स्पर्धेतील त्यांचा प्रवास थांबला. मात्र या पराभवानंतर स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. स्पर्धेतील त्याच्या कामगिरीची आकडेवारी समोर आल्यानंतर त्याच्या नावावर विश्वचषकाच्या इतिहासातील एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.संपूर्ण स्पर्धेत रोनाल्डोने गोल करण्यासाठी तब्बल १७ वेळा प्रयत्न केले. या प्रयत्नांमधून त्याने तीन गोलही झळकावले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, चार सामन्यांच्या कालावधीत त्याने आपल्या सहकाऱ्यांसाठी एकही गोलची संधी निर्माण केली नाही. अधिकृत विश्वचषक आकडेवारीनुसार, १९६६ पासून अशा प्रकारची ही सर्वाधिक नोंद ठरली आहे.

यापूर्वी हा विक्रम मेक्सिकोच्या अल्बर्टो गार्सिया आस्पेच्या नावावर होता. १९९८ च्या विश्वचषकात त्याने १५ शॉट्स घेतले होते, मात्र सहकाऱ्यांसाठी एकही संधी निर्माण केली नव्हती. त्यानंतर पोलंडचा जर्झी गोर्गोन, दक्षिण आफ्रिकेचा कॅटलेगो म्फेला आणि रशियाचा डेनिस चेरिशेव यांनी प्रत्येकी १३ शॉट्ससह ही यादी गाठली होती. रोनाल्डोने १७ प्रयत्नांसह हा विक्रम मागे टाकला.या आकडेवारीकडे मिश्र नजरेने पाहिले जात आहे. एका बाजूला रोनाल्डोने सातत्याने गोल करण्याचा प्रयत्न करत तीन वेळा जाळेही हलवले. दुसरीकडे, संघातील इतर खेळाडूंना संधी निर्माण करून देण्यात तो अपयशी ठरल्याचे आकडे स्पष्ट करतात. त्यामुळे त्याच्या खेळाच्या शैलीवर आणि संघातील भूमिकेवर चर्चा सुरू झाली आहे
दरम्यान, पोर्तुगालचे मुख्य प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांनी मात्र रोनाल्डोची ठामपणे बाजू घेतली आहे. त्यांच्या मते, रोनाल्डो मैदानावर असला की प्रतिस्पर्धी बचावपटूंचे लक्ष त्याच्याकडे केंद्रित होते आणि त्यामुळे इतर खेळाडूंना मोकळी जागा मिळते. त्यामुळे केवळ आकडेवारीवरून त्याच्या योगदानाचे मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पोर्तुगालचा विश्वचषकातील प्रवास संपला असला, तरी रोनाल्डोच्या कामगिरीची आणि त्याच्या नावावर नोंद झालेल्या या विक्रमाची चर्चा फुटबॉल विश्वात कायम आहे.