हिंगणघाट-वडकी-राळेगाव-पांढरकवडा-आदिलाबाद रेल्वेमार्गाची मागणी तीव्र
विदर्भ विकासासाठी रेल्वे मंत्रालयाने तातडीने पुढाकार घ्यावा
अमोल सांगाणी
राळेगाव,
Demand for a railway line देशातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 (काश्मीर ते कन्याकुमारी) हा उत्तर ते दक्षिण भारताला जोडणारा महत्त्वाचा जीवनदुवा मानला जातो. या महामार्गावरील नागपूर हैदराबाद हा पट्टा देशातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक समजला जातो. दररोज हजारो मालवाहतूक ट्रक, लक्झरी बस, खाजगी वाहने, औद्योगिक मालाची वाहतूक करणारी कंटेनर वाहने आणि विविध राज्यांना जोडणारी सार्वजनिक वाहतूक या मार्गावरून सुरू असते. एवढी प्रचंड वाहतूक असलेल्या या मार्गावर रेल्वेचा पर्याय निर्माण करण्याची मागणी आता केवळ अपेक्षा न राहता विकासाची गरज बनत असल्याचे मत परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
विशेष म्हणजे हिंगणघाट शहर रेल्वे जाळ्याशी जोडलेले आहे. आदिलाबाद हे शहरही रेल्वे सुविधेने जोडलेले आहे. मात्र या दोन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांदरम्यान असलेला वडकीराळेगावपांढरकवडा हा विस्तीर्ण भाग आजही रेल्वेपासून वंचित आहे. त्यामुळे या पट्ट्यातून नवीन रेल्वेमार्ग उभारून हिंगणघाट आणि आदिलाबाद यांना जोडण्याची मागणी आता जोर धरत आहे. या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे नागपूर-हिंगणघाट-वडकी-राळेगाव-पांढरकवडा-आदिलाबाद असा नवा रेल्वे दुवा निर्माण होऊ शकतो. पुढे हैदराबादकडे जाणाèया प्रवाशांसाठीही अधिक सुलभ रेल्वे संपर्क उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा मार्ग प्रत्यक्षात आला तर विदर्भ आणि तेलंगणमधील आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक संबंध अधिक मजबूत होऊ शकतात.
यवतमाळ जिल्ह्यातील वडकी, राळेगाव, पांढरकवडा आणि परिसरातील हजारो नागरिकांना आजही रेल्वे प्रवासासाठी लांबच्या स्थानकांवर अवलंबून राहावे लागते. विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी, रुग्ण उपचारांसाठी, व्यापारी व्यवसायासाठी आणि नोकरदार रोजगारासाठी नियमित प्रवास करतात. मात्र रेल्वेची थेट सुविधा नसल्याने त्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. या भागात कापूस, सोयाबीन, तूर आणि इतर पिकांचे मोठे उत्पादन होते. वनसंपदा, लघुउद्योग आणि व्यापारालाही या भागात महत्त्वाचे स्थान आहे. रेल्वे दुवा निर्माण झाल्यास कृषी माल आणि औद्योगिक उत्पादनांची वाहतूक कमी खर्चात, जलद आणि सुरक्षित पद्धतीने होऊ शकते. यामुळे स्थानिक बाजारपेठेला नवे बळ मिळेल आणि गुंतवणुकीच्या संधीही वाढतील.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर वाढत चाललेली वाहतूक, अपघातांचे प्रमाण, इंधनाचा वाढता खर्च आणि वेळेची नासाडी लक्षात घेता रेल्वे हा अधिक शाश्वत आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. या पट्ट्यात रेल्वे उपलब्ध झाल्यास महामार्गावरील प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वेकडे वळण्यास मदत होऊ शकते. नागरिकांचे म्हणणे आहे की, रेल्वेने या प्रस्तावाचे तातडीने सर्वेक्षण हाती घ्यावे, तांत्रिक अभ्यास करून रूपरेषा जाहीर करावी आणि या मागणीचा नियोजनात गंभीरपणे विचार करावा. या भागातील सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, व्यापारी व शेतकरी संघटना आणि सामाजिक संस्थांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा करावा.