खासदार बोंडे यांचे महावितरणला निर्देश
अमरावती,
Entrepreneurs' Electricity Issues औद्योगिक वसाहतींमधील विजेची समस्या गंभीर असून महावितरणने तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा. तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून उद्योजकांची दिशाभूल करू नये, अशा शब्दांत भाजपा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना निर्देश दिला. सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे उद्योजकांना आर्थिक फटका सोसावा लागत असल्याने, खासदारांनी उद्योजकांच्या बाजूने उभे राहत महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यावेळी खा. बोंडे यांनी निर्देश दिला. बैठकीला महावितरणचे मुख्य अभियंता प्रदीप अंधारे, उद्योग विभागाचे उपमहाव्यवस्थापक महेश निकम, नांदगाव पेठ एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष आफक सुभेदार, अमरावती एमआयडीसीचे किरण पातुरकर, कौशल्य व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी राजेश शेळके यांच्यासह विवेक सोळंके, राजेश घाटोळे, कमलेश डागा, सुनील सोमवंशी, रविकिरण वाघमारे, धीरज चौधरी आणि अनेक उद्योजक आभासी पद्धतीने उपस्थित होते.
बैठकीची सुरुवात होताच नांदगाव पेठ, अमरावती आणि सातूर्णा औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी वीज समस्येचा पाढा वाचला. वारंवार वीज खंडित होत असल्याने उत्पादनावर परिणाम होऊन नुकसान होत असल्याचा संताप व्यक्त केला. उद्योजकांच्या अडचणी समजून घेत खासदार बोंडे यांनी महावितरणला धारेवर धरले. उद्योगांना आवश्यक असलेला वीजपुरवठा कोणत्याही परिस्थितीत सुरळीत झालाच पाहिजे. भविष्यातील विजेची वाढती गरज लक्षात घेऊन आतापासूनच त्याचे ठोस नियोजन करा. उद्योजकांना सर्व आवश्यक सोयी-सुविधा पुरवा, जेणेकरून अमरावतीचे उद्योग अडचणीत येणार नाहीत तसेच विजेची मागणी पाहता तत्काळ नवीन सब स्टेशनची निर्मिती करून उद्योगांना दिलासा द्यावा,, अशा सूचना त्यांनी दिल्या.