कोलगाव-मुंगोली खाण परिसरातील पर्यावरणाला घातक ‘प्रोसोपिस बाभूळ’ हटविण्याची मागणी

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
वणी, 
‘Prosopis babool’ वेकोलिच्या मुंगोली व कोलगाव खुल्या कोळसा खाण परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या पर्यावरण व मानववस्तीला घातक ठरत असलेल्या विदेशी प्रजातीच्या ‘प्रोसोपिस’ (विलायती बाभूळ) झाडांचे तातडीने उच्चाटन करावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी वणी उपविभागीय अधिकाèयांकडे केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, वेकोलीने पर्यावरण संरक्षणासाठी विविध अटी व शर्तींनुसार गेल्या अनेक वर्षांत मोठ्या प्रमाणावर देशी वृक्षांची लागवड करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बेल, कडुलिंब, वड, पिंपळ, आवळा, आंबा, जांभूळ, अर्जुन, कांचन, बांबू आदी देशी वृक्षांची लागवड होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात खाण परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रोसोपिस बाभळीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
 
 
kolgav
 
ही विदेशी प्रजाती जमिनीतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात शोषण करते. तिच्या काटेरी झुडपांमुळे वन्यजीव, जनावरे तसेच नागरिकांना धोका निर्माण होत असून, परिसरातील शेतकरी, विद्यार्थी आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी जनावरांचा तसेच नागरिकांचाही या काटेरी झाडांमुळे अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनांचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वीच या प्रोसोपिस बाभळीचे निर्मूलन करण्याबाबत सूचना केल्याचा दावा करत, अद्यापही प्रभावी कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त करून वेकोलीने तातडीने या विदेशी प्रजातीचे संपूर्ण उच्चाटन करून त्याऐवजी स्थानिक हवामानाला पूरक देशी वृक्षांची लागवड करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी यवतमाळ, महाप्रबंधक वेकोली वणी क्षेत्र, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, क्षेत्रीय व्यवस्थापक वेकोली मुंगोलीकोलगाव यांच्यासह संबंधित अधिकाèयांना पाठविण्यात आल्या आहेत.