मंदिरात चोरी प्रकरणात आरोपीला शिक्षा

- न्यायालयाने ३५ हजारांचा दंडही ठोठावला; दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
temple theft case कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिरातील मूर्ती आणि दानपेटीतील रोकड चोरी करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवत १ वर्ष ५ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच एकूण ३५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. घनश्याम ऊर्फ संतोषकुमार ऊर्फ अंतर्यामी परमानंद दास (४५, रा. नयागड, ओडिशा) असे दोषीचे नाव आहे. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी सोनाली जगताप यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
 
 
temple theft case
 
आरोपी घनश्याम याने २७ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री कोतवाली हद्दीतील भट सभागृहासमोरील मंदिरात प्रवेश करून चांदीची मूर्ती आणि दानपेटीतील सुमारे २ लाख रुपयांची रोकड असा एकूण ११.८२ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आणि पसार झाला होता. मात्र पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे २१ मार्च २०२५ रोजी त्याला अटक केली. तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अभियोजन पक्षाने सादर केलेले पुरावे, पोलिसांनी केलेला तपास आणि साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत १ वर्ष ५ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच ३५ हजारांचा दंडही ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. न्यायालयाने भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (३) अंतर्गत आरोपीला २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास चार महिन्यांचा अतिरिक्त कारावास, तर कलम ३३१ (४) अंतर्गत १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास चार महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच कलम ३०५ (डी) अंतर्गतही कारावासाची शिक्षा कायम ठेवण्यात आली.temple theft case या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. नीलिमा देवगेकर आणि एम. एम. जायस्वाल यांनी बाजू मांडली, तर बचाव पक्षातर्फे अ‍ॅड.सिंघानिया यांनी काम पाहिले. पोलिसांच्या वतीने एएसआय विलास गोरे यांनी दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयीन कामकाजात प्रमोद येवले आणि गणेश डफ यांनी सहकार्य केले.