अनिल कांबळे
नागपूर,
crime news हुडकेश्वरमदून अल्पवयीन मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपी निर्मय उर्फ आकाश पाखरे याला रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर थेट कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी तपासाला वेग देत आरोपीच्या ठाणे येथील घराची झडती घेतली असून तेथून एक मोबाइल फोन आणि लॅपटॉप मिळाल्याची माहिती आहे. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून तपासातील महत्त्वाचे डिजिटल पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीच्या ठाणे येथील घरावर नागपूर पोलिसांनी छापा घातला. तेथे मोबाइल फोन आणि लॅपटॉप आढळून आले. आरोपीने सोशल मीडियावर बनावट ओळख निर्माण करून मुलींशी संपर्क साधल्याचा आरोप आहे. त्यामुळे या उपकरणांमधील चॅट, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया अकाउंट, फोटो, व्हिडिओ तसेच अन्य डिजिटल माहिती तपासासाठी महत्त्वाची ठरू शकते. घटनेच्या वेळी पोलिसांनी आरोपीचे दोन मोबाइल फोन आधीच जप्त केले होते.
..........
आरोपी नागपुरात कधी आणि कसा आला?
आरोपी मुंबई-ठाण्यातून नागपुरात नेमका कधी आणि कोणत्या विमानाने आला? विमानाचे तिकीट कोणी बुक केले? त्यासाठी कोणता मोबाइल क्रमांक किंवा ई-मेल वापरण्यात आला? तसेच तिकिटाचे पैसे कोणत्या माध्यमातून भरले गेले? या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास आरोपीच्या हालचालींची अचूक माहिती तपासात घेण्यात येणार आहे. यासाठी विमानतळाशी संबंधित रेकॉर्ड मिळविणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागपुरात आल्यानंतर आरोपी किशोरीच्या संपर्कात कसा आला, याचाही उलगडा होण्याची शक्यता आहे.
..........
हुडकेश्वर पोलिसांनी ठाणे-मुंबई येथील आरोपी निर्मय उर्फ आकाश पाखरे याला अल्पवयीन मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. आरोपीने सोशल मीडियावरील बनावट आयडीच्या माध्यमातून पीडितेशी संपर्क साधल्याचा आरोप आहे. त्याने मुलीला बेकायदेशीररीत्या डांबून ठेवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचेही आरोप आहेत. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी पोक्सो कायद्यासह अपहरण आणि हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
.............
आणखी मुली बळी ?
आरोपी तपासात सहकार्य करीत नसल्याचेही समोर आले होते. त्याच्या आतापर्यंत अनेक मुलींना बळी पडल्या असतील, अशी शक्यता आहे. त्याच्या ठाणे येथील घरापर्यंत पोहोचून इलेक्ट्रॉनिक उपकरणे मिळविणे हा तपासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आता या उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी करून त्यातील डिजिटल डेटाचे शास्त्रीय विश्लेषण करणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अनामिका मिर्झापूरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.crime news डिजिटल पुरावे, तांत्रिक माहिती आणि इतर उपलब्ध पुरावे एकत्र करून तपासाला योग्य दिशा देण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. आरोप न्यायालयात सिद्ध होण्यासाठी प्रत्येक पुराव्याची शास्त्रीय पद्धतीने पडताळणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे.