मुंबई
main wapas aaunga ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतात. यातील काही चित्रपटांना थिएटरमध्ये अपेक्षित यश मिळत नाही किंवा प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळतात. मात्र, ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळते आणि ते थेट ट्रेंडिंगच्या यादीत स्थान मिळवतात. असाच काहीसा प्रकार इम्तियाज अली दिग्दर्शित ‘मैं वापस आऊंगा’ या रोमँटिक ड्रामा चित्रपटासोबत घडला आहे. शुक्रवारी ओटीटीवर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट सातत्याने चर्चेत असून, नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत त्याने थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
दिलजित दोसांझ, शर्वरी वाघ, नसीरुद्दीन शाह आणि वेदांग रैना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मैं वापस आऊंगा’ हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी दमदार सुरुवात केली नव्हती. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने केवळ १.१५ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत वाढ होत गेली आणि अखेरीस त्याने बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कामगिरी केली.
‘मैं वापस आऊंगा’ने जगभरात ९९.३४ कोटी रुपये, तर भारतात ६५.१२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे बजेट ७० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या आकडेवारीनुसार, चित्रपटाने ४१ टक्क्यांचा नफा कमावला आहे. २०२६ मध्ये दमदार कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘मैं वापस आऊंगा’ नवव्या स्थानावर असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ओटीटीवर आल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर ‘मैं वापस आऊंगा’ने ट्रेंडिंगमध्ये थेट अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे थिएटरमधील कामगिरीपेक्षा ओटीटीवरील चित्रपटाची लोकप्रियता अधिक चर्चेत आली आहे.
‘कोईमोई’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘मैं वापस आऊंगा’ हा इम्तियाज अली यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत ‘लव आज कल’ ६७ कोटी रुपयांच्या कमाईसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ‘तमाशा’ ६५.५ कोटी रुपयांच्या कमाईसह दुसऱ्या स्थानी आहे. ‘मैं वापस आऊंगा’ ६५.१२ कोटी रुपयांच्या भारतातील कमाईसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ‘जब हैरी मेट सेजल’ ६२.५ कोटी रुपयांच्या कमाईसह चौथ्या, तर ‘रॉकस्टार’ ६२ कोटी रुपयांच्या कमाईसह पाचव्या क्रमांकावर आहे.
थिएटरमध्ये संथ सुरुवात झाल्यानंतर आता ओटीटीवर मिळालेल्या दमदार प्रतिसादामुळे ‘मैं वापस आऊंगा’ने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत अव्वल स्थान मिळवत या चित्रपटाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.