बसप्रवासात सई ताम्हणकरसोबत घडला धक्कादायक प्रकार

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
मुंबई
sai tamhankar अभिनेत्री सई ताम्हणकर हिला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मराठी मनोरंजनविश्वासोबतच बॉलिवूडमध्येही सईने आपल्या अभिनयाची भक्कम छाप निर्माण केली आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून दमदार भूमिका साकारत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र, सईचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीच्या काळात बसने प्रवास करत असताना तिला एका तरुणाच्या गैरवर्तनाचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे, या प्रसंगी शांत न बसता सईने त्या तरुणाला चांगलीच अद्दल घडवली. नुकत्याच एका मुलाखतीत सईने स्वतः या धक्कादायक प्रसंगाचा खुलासा केला असून, सध्या तिची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
 

sai tamhankar reveals shocking bus journey incident, actress recalls harassment experience 
मुलाखतीदरम्यान सईला ‘पुरुषांच्या वाईट प्रवृत्तीचा कधी सामना करावा लागला आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अभिनेत्रीने तिच्यासोबत रात्रीच्या बसप्रवासात घडलेला प्रसंग सांगितला. करिअरच्या सुरुवातीच्या काळात सई सांगली ते मुंबई असा प्रवास बसने करायची. रात्री बसने निघाल्यानंतर सकाळी ती मुंबईत पोहोचायची. अशाच एका प्रवासात तिच्या मागच्या सीटवर एक तरुण बसला होता. काही वेळ तो केवळ तिच्याकडे पाहत बसला.
मात्र, काही वेळानंतर त्या तरुणाने सईच्या कंबरेत हात टाकला. या प्रकारामुळे अभिनेत्री प्रचंड घाबरली. तरीही तिने घाबरून गप्प बसण्याऐवजी त्या तरुणाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. सईने त्याचा हात ओढून मुरगळला आणि त्याला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, पुन्हा हात पुढे आला तर तो हात मोडून मिळेल. सईने हात मुरगळल्यानंतर तो तरुण मोठ्याने ओरडला, अशी आठवण तिने मुलाखतीत सांगितली.
सई ताम्हणकरच्या अभिनय कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास, ‘दुनियादारी’, ‘गुलकंद’, ‘मिमी’, ‘तू ही रे’, ‘क्लासमेट्स’, ‘मानवत मर्डर्स’ आणि ‘तुंबाडची मंजुळा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे चाहतेही तिच्या आगामी चित्रपटांची कायम उत्सुकतेने वाट पाहत असतात.
अभिनयासोबतच सई सोशल sai tamhankar  मीडियावरही सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती वेळोवेळी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.