टीईटी पेपरफुटीचा महाराष्ट्रातील ‘कनेक्टिंग पॉइंट’ कोण?

प्रकाश पवारच्या अटकेने खळबळ

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
सोलापूर
tet paper leak शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले असून, या प्रकरणात सोलापुरातून प्रकाश पवार याला अटक करण्यात आली आहे. खासगी पोलीस प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणाऱ्या प्रकाश पवारला टीईटी पेपरफुटीचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने अटक केली. भिवंडी पोलिसांनी ही कारवाई केली असून, याप्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सोलापूरमधील परीक्षार्थी उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे.
 

tet paper leak maharashtra connection: solapur coach prakash pawar arrested 
सोलापुरातील कुमठे गावात प्रकाश पवार हा ‘ध्रुव प्रतिष्ठान’ या नावाने खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवत होता. गेल्या सुमारे 15 ते 20 वर्षांपासून तो विद्यार्थ्यांना पोलीस भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारी अकॅडमी चालवत असल्याची माहिती आहे. TET पेपरफुटी प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीच्या संपर्कात प्रकाश पवार होता, अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. तसेच काही विद्यार्थ्यांची कागदपत्रे त्याने मुख्य आरोपींना दिल्याचीही माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.
प्रकाश पवारचा टीईटी प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात नेमका काय संबंध होता, तसेच विद्यार्थ्यांची कागदपत्रे त्याने आरोपींना का दिली, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. त्याच्या संस्थेतून महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे मिळविण्याच्या दृष्टीनेही तपास पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे.
 
 
भिवंडी येथे टीईटीपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाकडून सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. सुरुवातीच्या कारवाईत दिल्ली, आग्रा आणि बिहार येथून काही आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर प्रश्नपत्रिका फुटीचे राज्यातील धागेदोरेही तपासात समोर येऊ लागले.
तपासाची व्याप्ती वाढल्यानंतर महाराष्ट्रातील काही व्यक्तींवर पोलिसांचा संशय बळावला. तपासादरम्यान प्रकाश पवार याचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. चौकशीदरम्यान पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या काही आरोपी विद्यार्थ्यांना पवारने काही दस्तावेज पुरवल्याचेही तपासात समोर आले आहे.
 
 
प्रश्नपत्रिका फुटीच्या या प्रकरणात आणखी कोणकोणत्या व्यक्तींचा संबंध होता आणि त्यांची भूमिका नेमकी काय होती, याचा तपास भिवंडी पोलिसांकडून सुरू आहे. प्रकाश पवारला आजच न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता असून, पुढील तपासात या प्रकरणातील महाराष्ट्रातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.