छत्रपती संभाजीनगर
bike accident मुलीला सासरहून माहेरी आणत असताना रस्त्यात अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात २४ वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावलेल्या माजी सैनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अय्युब अमीरशा मदार (रा. आडगाव पिशोर) असे मृत माजी सैनिकाचे नाव आहे. या अपघातात त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अय्युब मदार हे रेणुकाई पिंपळगाव येथून आपल्या विवाहित मुलीला घेऊन आडगावकडे दुचाकीवरून येत होते. बोरगाव बाजार फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरली आणि दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात अय्युब मदार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अय्युब मदार यांना तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच रात्री सव्वानऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
अय्युब मदार यांच्यावर आडगाव येथे माजी सैनिक, गावकरी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
अय्युब मदार यांनी काका हनीफ शाह यांच्या प्रेरणेने भारतीय सैन्यात प्रवेश केला होता. जबलपूर येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी लडाख, जम्मू, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान आणि सिक्कीमसह विविध दुर्गम सीमावर्ती भागांत तब्बल २४ वर्षे देशसेवा बजावली. देशासाठी प्रदीर्घ सेवा केलेल्या या माजी सैनिकाचा अशा प्रकारे अकाली मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.