मुंबई
maharashtra food adulteration crackdown दूध, पनीर आणि अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाईची शक्यता आहे. अन्न भेसळीचे प्रकार संघटित पद्धतीने होत असल्याचे समोर आल्याने संबंधित भेसळखोरांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसेच आरोपींविरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही राबवली जाऊ शकते.
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ अंतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची बैठक झाली. या बैठकीत विभागाच्या कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले तसेच आगामी वर्षासाठी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली. यावेळी अन्न भेसळीच्या प्रकारांविरोधात कोणतीही नरमाई न दाखवता कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणे हा केवळ साधा गुन्हा नसून अबालवृद्धांच्या जीवाशी खेळ असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. लहान मुलांकडून मोठ्या प्रमाणात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे बनावट पनीर, भेसळयुक्त दूध आणि अन्य भेसळयुक्त खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संघटित टोळ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
भेसळ रोखण्यासाठी खाद्यपदार्थांची तपासणी, नमुने घेणे, प्रयोगशाळेत त्यांची तपासणी करणे आणि त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यावर भर दिला जाणार आहे. अन्न भेसळीचे प्रकार संघटित स्वरूपात होत असल्याचे आढळल्यास मकोकासारख्या कठोर कायद्याचा वापर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, ज्येष्ठ सनदी अधिकारी maharashtra food adulteration crackdown तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यापासून भेसळखोरांविरोधात धाडसत्र सुरू आहे. या कारवायांमुळे भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची बाजारातील आवक घटल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अनेक हॉटेल, धाबे आणि रेस्टॉरंट चालकांमध्येही या कारवायांमुळे धाक निर्माण झाला आहे. विभागाच्या कारवाईला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
आता संघटित पद्धतीने अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात मकोका लागू करण्याची शक्यता व्यक्त झाल्याने आगामी काळात प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.