मुंबई
sanjay shirsat statement एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दोन महिन्यांपूर्वी ‘ऑपरेशन टायगर’ राबवून उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांना फोडण्यात आल्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार आणि नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा सातत्याने केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. “मागच्या गोष्टी काढून उपयोग नाही. काढायला बसलो तर उबाठाची सत्ता घालवण्यासाठी त्यांच्याच पक्षातील लोक होते हे समोर येईल. लवकरच तुम्हाला मोठ्या घडामोडी दिसतील,” असे शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटाचे पुढील लक्ष्य ठाकरे गटाचे आमदार आणि नगरसेवक आहेत का, याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे.
संजय शिरसाट आज वरळी वसतिगृहाची पाहणी करण्यासाठी आले होते. पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वसतिगृहातील परिस्थितीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. “ही साफसफाई आम्ही येणार होतो म्हणून झाली,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेतली. कच्ची फळे दिली जातात आणि जेवण वेळेवर मिळत नाही, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
“कंत्राटदारांना सांगितलं आहे, जमत असेल तर करा. खर्च करूनही चांगलं जेवण मिळत नसेल तर कसं चालणार?” असा सवाल शिरसाट यांनी केला. विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यानंतरच आपण पाहणीसाठी आलो असून, सचिवांनाही सोबत आणल्याचे त्यांनी सांगितले. “पैसे देऊन बदनाम होतोय. विद्यार्थ्यांवर आम्ही उपकार करत नाही, तर आमची बांधिलकी आहे,” असे म्हणत त्यांनी प्रधान सचिवांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे स्पष्ट केले.
वसतिगृहात अनधिकृतपणे काही जण राहत असल्याचा आरोपही शिरसाट यांनी केला. काही जण नोकरीदेखील करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. “नेमके विद्यार्थी कोण आणि घुसलेले कोण याचा शोध घेऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सांगितलं आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. उपकंत्राटदाराला नफा कमी मिळत असल्याने जेवणाचा दर्जा खालावतो, असेही त्यांनी सांगितले असून, या समस्येतून मार्ग काढला जाईल, असे स्पष्ट केले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग बंद होत असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता, आपल्याकडे तशी माहिती नसल्याचे शिरसाट यांनी सांगितले. उलट संभाजीनगरमध्ये मोठे प्रकल्प आले असून उद्योगांची संख्या वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरेंनी सीएम यांची भेट घेतली हे पहिल्यांदा घडलंय का? प्रश्न संवादाने सुटतात, म्हणून ते भेटले असतील,” असे ते म्हणाले.
दरम्यान, रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या तिढ्याबाबतही शिरसाट यांनी महत्त्वाची माहिती दिली. हा तिढा आठवडाभरात सुटेल आणि आज महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगत, “पालकमंत्रीच झेंडा फडकवतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया sanjay shirsat statement देताना शिरसाट यांनी पुन्हा ठाकरे गटावर निशाणा साधला. “मागच्या गोष्टी काढून उपयोग नाही. काढायला बसलो तर उबाठाची सत्ता घालवण्यासाठी त्यांच्याच पक्षातील लोक होते हे समोर येईल. लवकरच तुम्हाला मोठ्या घडामोडी दिसतील,” असे ते म्हणाले. या विधानामुळे ठाकरे गटातील संभाव्य राजकीय घडामोडींबाबत चर्चांना अधिकच वेग आला आहे.
याशिवाय, आपल्या नावाचा गैरवापर करून पैसे मागितल्याच्या कथित प्रकारावरही शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले. “संजय शिरसाट थायलंडला घेऊन जाणार म्हणून एक महिला पैसे घेत होती. तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. माझ्या नावावर पैसे मागत असतील, तर पोलिसात गुन्हा दाखल करा. अशा अफवा पसरवू नका,” असे आवाहन त्यांनी केले.