अखेर प्रतीक्षा संपली! रोनाल्डो-जॉर्जिनाने बांधली लग्नगाठ

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
लिस्बन,
ronaldo and georgina जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार जॉर्जियाना रॉड्रिग्ज अखेर विवाहबद्ध झाले आहेत. तब्बल ९ वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी आपल्या नात्याला विवाहाचे अधिकृत स्वरूप दिले. ११ ऑगस्ट रोजी रोनाल्डो आणि जॉर्जियाना यांनी सोशल मीडियावर लग्नाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. ४१ वर्षीय रोनाल्डो आणि ३२ वर्षीय जॉर्जियाना यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. या छायाचित्रात त्यांच्या हातातील लग्नाच्या अंगठ्या दिसत आहेत. या पोस्टला त्यांनी केवळ ‘CG’ असे छोटे कॅप्शन दिले. मात्र, लग्नसोहळ्याचे इतर कोणतेही छायाचित्र त्यांनी अद्याप सार्वजनिक केलेले नाही.
 
ronaldo and georgina
 
मिळालेल्या माहितीनुसार, पोर्तुगालमधील लिस्बनजवळील कास्केस या प्रसिद्ध किनारी रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. रोनाल्डोचे जनसंपर्क व्यवस्थापन करणाऱ्या ब्रन्सविक ग्रुपने हा समारंभ अत्यंत खासगी पद्धतीने पार पडल्याचे सांगितले. रोनाल्डो आणि जॉर्जियाना यांच्या पाचही मुलांची या खास सोहळ्याला उपस्थिती होती.
 
जॉर्जिनाने ऑगस्ट २०२५ मध्ये रोनाल्डोसोबत साखरपुडा झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर जवळपास एका वर्षाने दोघांनी विवाह केला आहे. त्यांच्या लग्नामुळे गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे. रोनाल्डो अलीकडेच २०२६ च्या फिफा विश्वचषकात पोर्तुगालकडून खेळताना दिसला होता.
 
रोनाल्डो आणि जॉर्जिनाची पहिली भेट २०१६ मध्ये माद्रिदमध्ये झाली होती. त्यावेळी जॉर्जिना गुच्चीच्या एका दुकानात काम करत होती. भेटीनंतर दोघांचे नाते अधिक घट्ट होत गेले. जानेवारी २०१७ मध्ये झुरिच येथे झालेल्या ‘बेस्ट फिफा फुटबॉल अवॉर्ड्स’ सोहळ्यात दोघे पहिल्यांदा सार्वजनिकरित्या एकत्र दिसले.
 
यानंतर रोनाल्डो आणि जॉर्जिना हे जगातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक बनले. जॉर्जिनाच्या ‘आय अॅम जॉर्जिना’ या नेटफ्लिक्स मालिकेत त्यांच्या नात्याबरोबरच कौटुंबिक आयुष्याचीही झलक पाहायला मिळाली. या मालिकेत रोनाल्डोने सुरुवातीला हे नाते इतके पुढे जाईल, याची कल्पना नसल्याचे सांगितले होते. मात्र, कालांतराने जॉर्जिना आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती असल्याची जाणीव झाल्याचे त्याने नमूद केले.
 
रोनाल्डो आणि जॉर्जिना यांना अलाना आणि बेला या दोन मुली आहेत. याशिवाय जॉर्जिना रोनाल्डोचा मोठा मुलगा क्रिस्टियानो ज्युनियर तसेच जुळी मुले इवा मारिया आणि मातेओ यांच्या संगोपनातही महत्त्वाची भूमिका बजावते. अखेर विवाहबंधनात अडकून या दोघांनी आपल्या ९ वर्षांच्या नात्याला अधिकृत नवे वळण दिले आहे.