मुंबई
Hemangi Kavi स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘सन मराठी’वरील ‘तू अनोखी तरी सोबती’ या मालिकेत नीलांबरीची नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री हेमांगी कवी हिने बालपणीच्या स्वातंत्र्यदिनाच्या आठवणींना उजाळा दिला. शाळेतील स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, सेटवर साजरा होणारा स्वातंत्र्यदिन आणि देशाच्या स्वातंत्र्यासोबतच आयुष्यात स्वतःची स्वप्ने पाहण्याचे व ती पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य किती महत्त्वाचे आहे, याबद्दलही तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
बालपणीच्या आठवणी सांगताना हेमांगी कवी म्हणाली की, शाळेत असताना स्वातंत्र्यदिनाची तयारी म्हणजे एक वेगळाच उत्साह असायचा. आपण स्पोर्ट्स गर्ल असल्यामुळे झेंडावंदनाची तयारी, ढोल-ताशे आणि ५२ सेकंदांत राष्ट्रगीत म्हणण्याची प्रॅक्टिस या सगळ्याची मनापासून तयारी केली जायची. आदल्या रात्री पांढऱ्या गणवेशाला इस्त्री करून ठेवण्यापासून दुसऱ्या दिवशी शाळेत झेंडावंदन करून घरी आल्यानंतर कॉलनी किंवा इमारतीत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यापर्यंतच्या त्या सगळ्या आठवणी आजही तितक्याच ताज्या असल्याचे तिने सांगितले.
मालिकांमध्ये काम सुरू केल्यानंतरही सेटवर स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची संधी मिळते, असे हेमांगीने सांगितले. संपूर्ण युनिट एकत्र येऊन राष्ट्रगीत म्हणते, तेव्हा मनात वेगळाच उत्साह निर्माण होतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, याची जाणीव कायम असते; मात्र स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ही जाणीव अधिक तीव्र होते, असेही तिने नमूद केले.
‘भारतात जन्माला आल्याचा मला मनापासून अभिमान आहे,’ असे सांगताना हेमांगी म्हणाली की, विशेषतः एक स्त्री म्हणून आपले मत मांडण्याचे, व्यक्त होण्याचे आणि स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, याला तिच्या आयुष्यात विशेष महत्त्व आहे. मराठी किंवा महाराष्ट्रीयन असण्यासोबतच ‘आपण एक भारतीय आहोत’, याचा तिला कायम सार्थ अभिमान वाटतो, असे तिने सांगितले.स्वातंत्र्याच्या संकल्पनेबद्दल बोलताना हेमांगीने तिच्या वैयक्तिक आयुष्याचा अनुभवही सांगितला. तिच्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ केवळ देशाच्या स्वातंत्र्यापुरता मर्यादित नसून, तो वैयक्तिक आयुष्याशीही जोडलेला आहे. तिचे वडील आणि ताई यांनी तिला नेहमी स्वतःची स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य दिले. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली असूनही वडिलांनी तिच्यावर कधीही बंधने लादली नाहीत. कपड्यांपासून करिअरच्या निवडीपर्यंत प्रत्येक निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिल्याचे हेमांगीने सांगितले.तिला आधी आर्टिस्ट आणि त्यानंतर ॲक्टर व्हायचे होते. कामानिमित्त रात्री एक वाजता घरी परतत असतानाही वडिलांनी तिला कधीच थांबवले नाही. आजही प्रत्येक मुलीला आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचे असेच स्वातंत्र्य मिळायला हवे, असे हेमांगीला वाटते. आपल्या घरात स्वतःला आणि बहिणीला हे स्वातंत्र्य मिळाले, यासाठी आपण खूप भाग्यवान असल्याचेही तिने सांगितले.
लग्नानंतरही पतीकडून तितकाच पाठिंबा आणि स्वातंत्र्य मिळत असल्याचे हेमांगीने नमूद केले. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासोबतच स्वतःच्या पद्धतीने जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले, यासाठी आपण स्वतःला खूप भाग्यवान समजत असल्याची भावना तिने व्यक्त केली.