मुंबई
himanshi khurana ‘बिग बॉस 13’ फेम अभिनेत्री हिमांशी खुरानाने तिचा माजी प्रियकर असिम रियाझसोबतच्या नात्याबाबत अनेक वर्षांनंतर मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच पारस छाबडाच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत हिमांशीने दावा केला की, असिमच्या दबावामुळे एकेकाळी ती इस्लाम धर्म स्वीकारण्याच्या अगदी जवळ पोहोचली होती. रिलेशनशिपमध्ये असताना असिमने पूजा-पाठ आणि धार्मिक श्रद्धांबाबत अनेकदा आक्षेप घेतल्याचेही तिने सांगितले. धर्माबाबतचा मानसिक दबाव इतका वाढला होता की, एका रात्री तिला आपला आयुष्यातील शेवटचा दिवस असल्यासारखे वाटले होते, असा धक्कादायक दावाही तिने केला. धर्मांतर करण्यापूर्वी तिला चारधाम यात्रा करण्याची इच्छा होती, असेही हिमांशीने सांगितले.
हिमांशी खुराना आणि असिम रियाझ यांची पहिली भेट ‘बिग बॉस 13’च्या घरात झाली होती. शोदरम्यान दोघांमधील जवळीक चर्चेचा विषय ठरली होती. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतरही दोघांनी आपले नाते पुढे नेले. सोशल मीडियावर ही जोडी प्रचंड लोकप्रिय झाली होती. चाहत्यांनी त्यांना ‘असिमांशी’ असे नावही दिले होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. डिसेंबर 2023 मध्ये दोघांनी ब्रेकअपची घोषणा केली. धर्म आणि धार्मिक श्रद्धा वेगवेगळ्या असल्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी हिमांशीने सोशल मीडियावर असिमसोबतच्या खासगी चॅट्सचे स्क्रीनशॉटही शेअर केले होते, ज्यात धर्माचा उल्लेख होता.
आता पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना हिमांशीने त्या काळातील अनुभव सांगितला. रिलेशनशिपमध्ये असताना असिमने तिला स्पष्टपणे सांगितले होते की, पूजा-पाठ यापुढे चालणार नाही. त्याच्या कुटुंबाकडून आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धांकडूनही आपल्यावर दबाव होता, असा दावा तिने केला. हा दबाव हळूहळू इतका वाढला की आपण इस्लाम धर्म स्वीकारण्याच्या अगदी जवळ पोहोचल्याचे हिमांशीने सांगितले.
असिमच्या प्रेमात आपण इतकी गुंतलेली होती की, त्याच्यासाठी धर्म बदलायलाही तयार झाले होते, असे हिमांशीने म्हटले. मात्र, धर्मांतर करण्यापूर्वी तिला चारधाम यात्रा करायची होती. पुन्हा कधीही आपल्या धर्माशी जोडले जाऊ शकणार नाही, या भीतीमुळे शेवटची चारधाम यात्रा करावी, अशी भावना मनात होती, असे तिने सांगितले. त्याच वेळी आपल्या निधनानंतर अंत्यविधी कोणत्या पद्धतीने होतील, आपल्या पार्थिवाला मुखाग्नी दिला जाईल की दफन केले जाईल, असे अनेक प्रश्नही मनात घोळत असल्याचे हिमांशीने सांगितले.
कोणत्याही नात्यात एखाद्या व्यक्तीवर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकणे योग्य नसल्याचे हिमांशीने स्पष्ट केले. प्रत्येकाला आपली धार्मिक ओळख आणि श्रद्धा जपण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, असे तिचे मत आहे. त्या काळात आपण प्रचंड भावनिक दबावाखाली होतो आणि त्यानंतर धर्म बदलणे हा योग्य निर्णय ठरणार नाही, याची जाणीव झाल्याचेही हिमांशीने सांगितले.