पेरू
singer soraya nieto पेरूमधील एका स्थानिक महोत्सवात लाइव्ह परफॉर्मन्स करत असताना गायिका सोराया नीटो यांच्यावर काचेची बाटली फेकून हल्ला करण्यात आला. ८ ऑगस्ट रोजी पेरूच्या अयाकुचो विभागातील हुआमांगा प्रांताच्या ओक्रोस जिल्ह्यातील चुम्बेस येथे ही धक्कादायक घटना घडली. या हल्ल्याचा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो पाहून नीटो यांच्या चाहत्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही गायक-कलाकारांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड आणि हरियाणातील गायक-रॅपर राहुल फाजिलपुरिया यांच्यावरही यापूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गर्दीतून एक व्यक्ती सोराया नीटो यांच्या दिशेने काचेची बाटली फेकताना दिसत आहे. नीटो यांचा कार्यक्रम अपेक्षेपेक्षा अधिक वेळ सुरू राहिल्याने हा व्यक्ती नाराज होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याने थेट स्टेजच्या दिशेने काचेची बाटली फेकली आणि ती नीटो यांच्या चेहऱ्यावर आदळली. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या.
काचेच्या बाटलीच्या तडाख्यामुळे नीटो यांच्या चेहऱ्यावर अनेक बारीक जखमा झाल्या. त्यांच्या डाव्या पापणीवर दुखापतीची खूण असून, भुवईच्या आसपास सूज आली आहे. तसेच खालच्या ओठाखाली खोल जखम झाली असून, त्यावर टाके घालावे लागले. हल्ल्याची तीव्रता इतकी होती की त्यांचा चष्माही पूर्णपणे फुटला. मात्र, फुटलेल्या चष्म्याच्या काचेमुळे त्यांच्या डोळ्यांना कोणतीही इजा झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
‘एल हेराल्डो डी मेक्सिको’च्या वृत्तानुसार, या घटनेनंतर परिसरातील अनेक नागरिक आणि त्यांचे मित्र तातडीने मदतीसाठी धावून आले. चेहऱ्यावरून रक्तस्राव होत असल्याने त्यांना तातडीने मदतीची गरज होती. या मदतीबद्दल नीटो यांनी संबंधितांचे आभार मानले. मात्र, त्याच ठिकाणी दुसऱ्या स्टेजवर परफॉर्म करणाऱ्या संगीतकार आणि एका कलाकाराने आपल्याला कोणतीही मदत केली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. हल्ल्यानंतरही हे कलाकार आपली परफॉर्मन्स सुरू ठेवत होते, असे त्यांनी सांगितले.
घटनेनंतर सोराया नीटो यांनी आपल्या दुखापतींची तीव्रता निश्चित करण्यासाठी फॉरेन्सिक वैद्यकीय तपासणी करून घेणार असल्याचे स्पष्ट केले. शारीरिक हल्ला आणि चेहऱ्यावर झालेल्या दुखापतीप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार दाखल करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. तसेच चाहत्यांनी पाठवलेल्या समर्थन आणि सहानुभूतीच्या संदेशांबद्दल त्यांनी आभार मानले असून, पुढील कायदेशीर कारवाईबाबत त्यांना वेळोवेळी माहिती देत राहणार असल्याचे नीटो यांनी सांगितले आहे.