मुंबई
vinod kambli भारताचे माजी क्रिकेटपटू आणि स्टार फलंदाज विनोद कांबळी यांचे आयुष्य आता मोठ्या पडद्यावर नव्हे, तर वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. दिग्दर्शक अभिजीत देशपांडे कांबळी यांच्या जीवनावर आधारित ‘कांबळी’ नावाची हिंदी वेब सीरिज घेऊन येत आहेत. ही सीरिज एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून, ‘२०० नॉट आऊट प्रॉडक्शन्स’चे रवी भागचंदका तिची निर्मिती करत आहेत.
अभिजीत देशपांडे यांनी सांगितले की, २०१९ मध्ये त्यांनी कांबळी यांच्या जीवनावर संशोधन आणि कथालेखन सुरू केले. सुरुवातीला त्यांच्या जीवनावर मराठी चित्रपट बनवण्याची योजना होती. मात्र, संशोधनादरम्यान कांबळी यांची जीवनकथा खूप व्यापक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यातील अनेक पैलू एकाच चित्रपटात मांडणे कठीण असल्याने अखेर त्यांच्या जीवनावर वेब सीरिज बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सीरिजमध्ये कांबळी यांची क्रिकेट कारकीर्द, वैयक्तिक आयुष्य आणि त्यांनी केलेला संघर्ष यांचा वेध घेतला जाणार आहे. त्यांच्या विलक्षण प्रतिभेपासून क्रिकेटमधील प्रचंड यशापर्यंत आणि संपूर्ण कारकिर्दीत आलेल्या अडचणींपर्यंतचा प्रवास या कथेत पाहायला मिळणार आहे. मात्र, ही कथा केवळ क्रिकेट किंवा कांबळी यांच्या आयुष्यातील वादांपुरती मर्यादित राहणार नसल्याचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. कांबळी केवळ क्रिकेटपटू म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणूनही प्रेक्षकांना समजावा, हा या सीरिजमागील प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कांबळींची भूमिका कोण साकारणार?
सीरिजच्या टीमकडून विनोद कांबळी यांची भूमिका साकारण्यासाठी योग्य अभिनेत्याचा शोध सुरू आहे. केवळ कांबळी यांच्यासारखा दिसणारा नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी आणि शैलीशी जुळणारा अभिनेता निवडण्याला प्राधान्य दिले जात आहे. मोठ्या स्टारपेक्षा भूमिकेला योग्य न्याय देणाऱ्या अभिनेत्याला संधी देण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. या सीरिजमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यातील मैत्रीचाही महत्त्वाचा भाग पाहायला मिळणार आहे.
सीरिजच्या चित्रीकरणाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. निर्माते नोव्हेंबर २०२६ मध्ये चित्रीकरण सुरू करण्याच्या तयारीत आहेत. नियोजनानुसार, संपूर्ण चित्रीकरण एकाच शेड्यूलमध्ये पूर्ण केले जाणार असून, त्यासाठी अंदाजे तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. सीरिजचे काम पूर्ण झाल्यानंतर दिग्दर्शक अभिजीत देशपांडे व्ही. शांताराम यांच्या बायोपिकवर पुन्हा काम सुरू करणार आहेत.