सहाय्यक कृषी अधिकारी पदाला आकृतीबंधाचा फटका!

कृषी विभागात क्षेत्रीय स्तरावर वाढणार मोठा असमतोल

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
वर्धा,
agriculture officer post मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळच्या बैठकीत कृषी विभागाच्या नवीन आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली. यामध्ये क्षेत्रीय स्तरावर असमतोलपणा दिसून येत आहे. १५०० शेतकर्यांसाठी एक सहाय्यक कृषी अधिकारी दिल्याने जिल्ह्यात क्षेत्रीय स्तरावरील सुमारे ५५ पदे कमी करण्यात आली. सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे आधीच ६ ते १० गावे आहेत व अतिरिक्त कार्यभार असल्यास १५ गावांचा पदभार सहाय्यक कृषी अधिकारी सांभाळत आहे. अशातच अजून नवीन गावांची भर पडणार असल्याने सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यामध्ये असंतोष पसरलेला आहे.
 
 
 
agriculture officer post
 
 
सहाय्यक कृषी अधिकारी हे ग्रामस्तरावर शासनाच्या योजना राबवतो. बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे, शेतकरी सभा, प्रशिक्षणे, किड व रोग सर्वेक्षण करणे, पीक कापणी प्रयोग, मृद व जल संधारणाची कामे, नरेगा, नैसर्गिक आपत्तीचे संयुक्त पंचनामे यासह राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांची कामे पार पाडतात. शासनाच्या योजना सुरळीत अंमलबजावणीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेने कृषी विभागाचे सज्जे हे महसूल विभागासारखे करण्याची मागणी केली होती. परंतु, नवीन आकृतीबंधामध्ये १५०० शेतकर्यांसाठी एक सहायक कृषी अधिकारी दिल्याने जिल्ह्यातील किमान ५५ सहाय्यक कृषी अधिकार्यांची पदे कमी केली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात कराड तालुक्यात ३६ सहाय्यक कृषी अधिकारी होते ते नवीन आकृतीबंधाने ९८ झाले. असा असमतोल या आकृतीबंधात असल्याने सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेने यावर फेरविचार करण्याची मागणी कृषी आयुक्तांकडे केली आहे.
या आकृतीबंधाने जिल्ह्यातील ३ उपविभागीय कृषी अधिकारी व १७ मंडळ कृषी अधिकारी कार्यालये सुद्धा बंद होणार असून क्षेत्रीय २८ उप कृषी अधिकारी यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात पदस्थापना करण्यात आली आहे.agriculture officer post आधीच गावाचा व्याप जास्त असताना आणखी त्यात भर पडल्यावर निश्चितच गावपातळीवर शेतकर्यांच्या समस्यांचे निराकरण, योजना पोहचवणे, पंचनामे करणे अडचणीचे जाणार आहे.
जमीन क्षेत्रधारणा निकषच चुकीचा
१५०० शेतकर्यांमागे एक सहायक कृषी अधिकारी हा निकष मुळात चुकीचा आहे. राज्यातील अन्य विभागांच्या तुलनेत विदर्भात कमाल जमीन क्षेत्रधारणा जास्त आहे. त्यामुळे कराड तालुक्यात ९८ तर बारामती तालुक्यात ७७ सहायक कृषी अधिकारी या तुलनेत जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात ३६ ऐवजी २८ सहाय्यक कृषी अधिकारी राहतील. तसेच क्षेत्रीय स्तरावर उप कृषी अधिकारी संख्या वाढविणे गरजेचे असताना कार्यालयातील संख्या वाढविलेल्या आहेत. त्यामुळे काम करणारा क्षेत्रीय स्तरावर एकटा सहाय्यक कृषी अधिकारी आणि आढावा घेणारे अधिकारी जास्त झालेले आहेत.