कोल्हापुर
kolhapur st workshop accident कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यवर्ती बसस्थानकातील एसटी वर्कशॉपमध्ये रॅम्पवर काम करत असताना एसटी बसच्या चाकाखाली आल्याने एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. पांडुरंग अण्णाप्पा चव्हाण असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, शनिवारी सकाळी सुमारे 11 वाजता ही घटना घडली. या दुर्घटनेमुळे वर्कशॉपमध्ये एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एसटी वर्कशॉपमध्ये पांडुरंग चव्हाण कार्यरत होते. ते एसटी महामंडळात चालक म्हणून सेवेत होते. मात्र, आजारी असल्याने त्यांची नेमणूक वर्कशॉपमध्ये करण्यात आली होती. शनिवारी सकाळी ते वर्कशॉपमधील रॅम्पवर काम करून परत येत होते.
याचवेळी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास चालक सिकंदर मणेर एसटी बस दुरुस्तीसाठी वर्कशॉपमध्ये घेऊन जात होते. त्यांनी बस रॅम्पवरून पुढे नेली. त्यावेळी पांडुरंग चव्हाण बसच्या पुढील चाकाखाली आले. बसचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटना घडताच वर्कशॉपमधील इतर कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करत चालकाला बस थांबवण्यास सांगितले. त्यानंतर सिकंदर मणेर यांनी बस थांबवली. मात्र, तोपर्यंत चव्हाण यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.
अपघाताची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रकरणाची नोंद केली. चालक सिकंदर मणेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, चालकाने कोणतीही पूर्वसूचना न देता बस पुढे घेतल्याने हा अपघात झाल्याची चर्चा आहे. या घटनेचे थरारक दृश्य वर्कशॉपमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. पांडुरंग चव्हाण यांच्या आकस्मिक मृत्यूने त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही होत आहे.