who can benefit from niacinamide त्वचेची चमक, मुरुम, काळे डाग आणि अतिरिक्त तेल यांसारख्या समस्यांसाठी सध्या नियासिनमाइडचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. व्हिटॅमिन बी३चा हा एक प्रकार असून त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि काही त्वचाविषयक समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतो. मात्र, प्रत्येकाच्या त्वचेवर त्याचा परिणाम सारखा असेलच असे नाही. त्यामुळे त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन त्याचा वापर करणे महत्त्वाचे आहे.
त्वचारोग विभागातील डॉ. आंचल पंथ, एमडी यांच्या मते, मुरुमांची समस्या असलेल्या त्वचेसाठी नियासिनमाइड उपयुक्त ठरू शकते. मुरुमांसोबतच त्वचेवरील उघडी छिद्रे, मुरुमांनंतर राहिलेले काळे डाग आणि निस्तेजपणा कमी करण्यासाठीही त्याचा फायदा होऊ शकतो. त्वचेतील सेबमचे म्हणजेच नैसर्गिक तेलाचे उत्पादन नियंत्रित करण्यास नियासिनमाइड मदत करते. अशा त्वचेसाठी दिवसातून दोन वेळा त्याचा वापर करता येतो. सकाळी चेहरा स्वच्छ केल्यानंतर प्रथम व्हिटॅमिन सी, त्यानंतर नियासिनमाइड सीरम, मॉइश्चरायझर आणि शेवटी सनस्क्रीन लावण्याचा सल्ला दिला जातो.
तेलकट त्वचेच्या बाबतीतही नियासिनमाइड प्रभावी मानले जाते. चेहऱ्यावर तयार होणाऱ्या अतिरिक्त सेबमवर नियंत्रण ठेवण्यास त्याची मदत होऊ शकते. रात्रीच्या त्वचा निगा दिनक्रमात त्याचा समावेश करता येतो. रात्री रेटिनॉलनंतर नियासिनमाइड सीरम लावून त्यावर मॉइश्चरायझर वापरण्याची पद्धत सांगितली जाते. कोरड्या त्वचेसाठीही नियासिनमाइड वापरता येते. रात्रीच्या वेळी प्रथम नियासिनमाइड आणि त्यानंतर रेटिनॉल लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, त्वचा अतिशय कोरडी किंवा संवेदनशील असल्यास नियासिनमाइडचा वापर टाळणे योग्य ठरू शकते.
नियासिनमाइड पहिल्यांदाच वापरणाऱ्यांनी सुरुवातीला ५ टक्के सांद्रतेचे उत्पादन निवडावे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. अधिक प्रमाणातील नियासिनमाइडमुळे काही जणांच्या त्वचेवर त्रास किंवा संवेदनशीलता निर्माण होऊ शकते. सकाळी किंवा संध्याकाळी, तसेच गरजेनुसार दिवसातून दोन वेळा त्याचा वापर करता येतो. किंचित ओलसर त्वचेवर लावल्यास ते अधिक प्रभावी ठरू शकते. मात्र, त्वचेचा प्रकार, आधीपासून वापरात असलेली उत्पादने आणि त्वचेची संवेदनशीलता यानुसार परिणाम बदलू शकतो. त्यामुळे त्वचेवर सतत जळजळ, लालसरपणा किंवा इतर त्रास जाणवत असल्यास उत्पादनाचा वापर थांबवून त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.