कोल्हापूर
Kolhapur Gutkha Smuggling पुणे-बंगळूर महामार्गावर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत भादोले येथील 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. वल्लभ संजय माने असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यात तब्बल 20 पोती गुटखा आढळून आल्याने या अपघातामागील धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी अवैध गुटख्यासह 22 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरोली एमआयडीसी परिसरातील बालभारती येथे मंगळवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. भरधाव कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात वल्लभ माने यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, अपघातानंतर कारमधील गुटख्याची काही पोती बाहेर काढून चालक मोहम्मदखॉजा अब्दुलसतार कडगी (वय 25, रा. कोकरे गल्ली, निपाणी) हा घटनास्थळावरून पसार होण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कारची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये अडीच लाख रुपये किमतीचा सुमारे 20 पोती गुटखा आढळून आला.
सदर कार निपाणी येथील असून, त्यातून गुटखा घेऊन कराडच्या दिशेने जात असल्याची माहिती समोर आली आहे. निपाणीजवळील एका गावात हा गुटखा तयार केला जात असल्याचे सांगितले जात आहे. महागड्या कारमधून चालक मोहम्मदखॉजा हा रात्रीच्या वेळी गुटख्याची वाहतूक करत होता. पोलिसांची भीती असल्याने कार सुसाट वेगाने चालवली जात असल्याचा आरोप आहे.
दुसरीकडे, वल्लभ माने हे शिरोली येथील एका कंपनीत काम करत होते. रात्रपाळी आटोपल्यानंतर ते उशिरा घरी निघाले होते. बालभारती परिसरात महामार्गावरून जात असताना मागून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वल्लभ दुचाकीवरून उडून आधी कारवर आदळले आणि त्यानंतर महामार्गावर जोरात आपटले. दोन्ही वेळा त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी अवैध गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताच्या निमित्ताने अवैध गुटखा वाहतुकीचा प्रकार उघडकीस आल्याने या रॅकेटविरोधात कठोर आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.