स्कूल व्हॅनला भीषण आग मोठी दुर्घटना टळली

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
पुणे 
School Van पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी स्कूल व्हॅनला अचानक भीषण आग लागल्याची थरारक घटना समोर आली आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण व्हॅनला वेढले आणि पाहता पाहता व्हॅन जळून खाक झाली. सुदैवाने, या वेळी व्हॅनमध्ये एकही विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना आणि अनर्थ टळला.
 

Pimpri-Chinchwad School Van Catches Fire; Major Tragedy Averted as No Students Were Inside 
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विद्यार्थ्यांना ‘इंदिरा शाळेत’ सुरक्षितपणे सोडल्यानंतर व्हॅन चालक गाडी दुरुस्तीसाठी गॅरेजच्या दिशेने जात होता. त्यावेळी चालू व्हॅनमधून अचानक धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र, त्यानंतर काही क्षणांतच आगीने संपूर्ण व्हॅनला वेढले आणि आगीने अत्यंत रौद्र रूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तसेच वाकड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, आग लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यात आले होते. त्यामुळे घटनेच्या वेळी व्हॅनमध्ये लहान मुले नसल्याने मोठी जीवितहानी किंवा दुखापत टळली.मात्र, आगीच्या भीषण तांडवात स्कूल व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. व्हॅनला ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली की शॉर्टसर्किटव्यतिरिक्त अन्य कोणत्या कारणामुळे लागली, याचा सखोल तपास वाकड पोलीस करत आहेत.