नागपूर,
Tulsidas Jayanti तुलसीदास हे मानवी मूल्यांचे प्रतिष्ठापक होते. त्यांनी श्रीरामांच्या चरित्रातून समता, बंधुता आणि मानवतेला युगानुरूप वाणी दिली, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे माजी सदस्य अजय पाठक यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभाग व पूर्व विद्यार्थी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचारगोष्ठीत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. श्रीरामचरितमानस हे आदर्श समाजनिर्मितीचा आधार असून, तुलसीदास हे लोकमानसाचे सजग कवी होते, असे त्यांनी सांगितले. श्रीरामांनी केवट, शबरी, जटायू यांच्यासह वानर, अस्वल व वनवासी समाजाला आपलेसे करून समतेचा संदेश दिला, असेही पाठक यांनी नमूद केले.

हिंदी विभागप्रमुख डॉ. मनोज पांडेय यांनी तुलसीदासांचे काव्य लोकजीवनातील उच्च आदर्शांची प्रतिष्ठापना करणारे असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. मधुलता व्यास यांनी तुलसींच्या साहित्यात भारतीय जीवनमूल्यांसह समाजातील सर्व वर्गांच्या भावनांना वाचा फोडल्याचे नमूद केले.यावेळी उत्कृष्ट काव्यपठणासाठी सीमा चौटलिया, अंकुश द्विवेदी व गौरी शर्मा यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. जागृती सिंह यांनी केले, तर डॉ. नीलम विराणी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:डॉ. लखेश चंद्रवंशी,संपर्क मित्र