अमरावती, चांदूरबाजार, मोर्शीत सावकारांवर धाडी

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेची कारवाई

    दिनांक :21-Aug-2026
Total Views |
अमरावती
raids-on-moneylenders जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या सहा वेगवेगळ्या पथकाने शुक्रवारी अमरावतीत २, चांदूरबाजार ३ आणि मोर्शीत १ अशा सहा ठिकाणी सावकारांवर धाडी टाकून आवश्यक कागदपत्रे गोळा केली. गेल्या तीन दिवसांपासून ११ ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली आहे. महिला तक्रारदार रा. तरोडा डोमक ता. मोर्शी यांनी पती पवन भाकरे यांनी अवैध सावकारीला व बेकायदेशीर व्याज वसुलीला कंटाळून २५ जुलैला खेड येथील शेतशिवारात आत्महत्या केली असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयात केली होती.

amravati 
 
 
सदर तक्रारीच्या अनुषंगाने पथक प्रमुख किशोर इंगळे (सहायक निबंधक सहकारी संस्था चांदूर रेल्वे) यांनी घनश्याम गट्टाणी रा. राधाकृष्ण कॉलनी मोर्शी यांच्या घरी झडतीची कारवाई केली. सदर ठिकाणी कोणतेही संशयास्पद दस्तऐवज आढळून आलेले नाही. दुसरी कारवाई पथक प्रमुख स्वाती गुडधे यांनी नवनीत रतनलाल चांडक यांच्या देवी रेसीडेन्सी, आराधना बिल्डींग, अमरावती येथील दोन सदनिकामध्ये झडतीची कारवाई केेली. येथे धाड पथकास अवैध सावकारी संबंधाने ३२ संशयास्पद दस्तऐवज प्राप्त झाले. तिसरी कारवाई पथक प्रमुख प्रीती धामणे यांनी नवनीत रतनलाल चांडक यांच्या गौरीनंदन प्रोव्हीजन्स, कठोरा रोड, अमरावती या किराणा दुकानात केली. सदर ठिकाणी एक कोरा (नाव नसलेला) धनादेश आढळून आला. तो जप्त करण्यात आला. चाैथी कारवाई पथक प्रमुख अनिरुध्द राऊत (सहायक निबंधक प्रशासन १) यांनी राजेश चांडक, रा. मारवाडीपुरा चांदूरबाजार यांचे राहते घरी केली. सदर ठिकाणी कोणतेही संशयास्पद दस्तऐवज आढळून आलेले नाही. पाचवी कारवाई पथक प्रमुख आशिष चर्जन (सहायक निबंधक, सहकारी संस्था, वरुड) यांनी कमलकिशोर सारडा यांच्या आनंद ट्रेडर्स जयस्तंभ चौक, चांदूरबाजार येथील प्रतिष्ठानमध्ये केली. येथे ९ कोरे स्टॅम्प आढळून आलेले आहे. पथकाने चौकशीसाठी ते ताब्यात घेतले. सहावी कारवाई पथक प्रमुख सचिन पतंगे (सहायक निबंधक, सहकारी संस्था नांदगाव खंडेश्वर) यांनी कैलास सारडा रा. चांदूरबाजार यांच्या राहते घरी केली. सदर ठिकाणी ९ दस्तऐवज आढळून आले. त्यामध्ये स्थावर मालमत्ता खरेदीखत, नोंदवही, असे अन्य दस्तऐवज धाड पथकाने चौकशीकरीता सिल केलेले आहे. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सदर प्रकरणात जप्त केलेल्या कागदपत्रांची पडताळणी विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन व जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांच्या मार्गदर्शनात स्वाती गुडधे करणार आहेत.