गोंदिया
shiv-sainiks-in-gondia शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या तयारीला वेग आलेला असतानाच गुरुवारी 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्री शिवसेना व युवासेनाच्या शिवसैनिकांमध्ये राडा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहरातील पोवार बोर्डिंग येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रूपेश कुथे यांच्यावर युवा सेनेचे कार्यकर्ते ऋषभ मिश्रा आणि रजा भाई यांनी हल्ला केल्याचा आरोप कुथे यांनी केला असून, याप्रकरणी त्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे ऋषभ मिश्रा यांनीही रामनगर पोलिसात शिवेसना पदाधिकार्यांच्या विरोधात तक्रार नोंदविल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारी नोंदवून तपास सुरू केल्याची माहिती आहे.
शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याच्या तयारीसाठी पोवार बोर्डिंग येथे बैठक व अन्य नियोजन सुरू असताना ही घटना घडली. कार्यक्रमस्थळी आपला फलक प्रमुख ठिकाणी लावण्यात यावा तसेच मंचावर स्थान मिळावे, या मागणीवरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा प्रमुख रुपेश कुथे यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत आपल्यावर मद्यधुंद अवस्थेत युवा सेनेचे कार्यकर्त्यांनी सशस्त्र हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तर या घटनेमागे युवा सेनेचे ऋषभ मिश्रा व रजा भाई यांचा सहभाग असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, मिश्रा यांच्यावर लोकांमध्ये दहशत निर्माण करून खंडणी वसूल करतात असे गंभीर आरोप कुथे यांनी केले आहे.
दुसरीकडे ऋषभ मिश्रा व त्यांच्या कुटूंबीयांनी स्थानिक सोशल मिडीयावर दिलेल्या आपल्या बयाणामध्ये जिल्हाप्रमुखांनी लावलेले सर्व आरोप फेटाळले असून उलट त्यांच्यावरच शिवसेना पदाधिकार्यांनी प्राणघातक हल्ला केल्याचे सांगून पोलिसात तक्रार नोंदविल्याचे सांगतिले आहे. या घटनेमुळे शिवसेना (शिंदे) तील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. विशेष म्हणजे, मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या गोंदिया दौर्याच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार घडल्याने पक्षांतर्गत वादाला कोणते वळण मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मेळाव्यादरम्यान या वादावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, रामनगर पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून, हल्ल्याचे नेमके कारण आणि सहभागींची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे.