कीर्तिरूपांच्या आठवकथा - डॉ. रमा गोळवलकर

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |

मंदोदरी
dr rama golwalkar वाल्मीकि रामायणात ‘युद्धकांड’ या शेवटच्या भागातील १११ सर्गात रावणवधानंतर मंदोदरीचा शोक १२८ श्लोकांत वर्णिला आहे. त्या आधी या महाकाव्यात कधीही तिचा पुसटसाही उल्लेखही येत नाही. परंतु स्त्री पंचकात तिचं नाव आवर्जून आहे. अहिल्या, द्रौपदी, कुंती आणि तारा या चार स्त्रियांसह तिचं नाव नित्य घेतलं तर पुरुषांच्या महापातकांचा नाश होतो, असा एक श्लोक आहे. अहिल्येविषयीच्या लेखात हीच पाच नावं असलेला श्लोक उद्धृत केला, त्यावेळी अनेक सुज्ञ वाचकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्या पाच नावांचा खुलासा करण्यापासूनच या लेखाची सुरुवात करू या.
 
 
 
 
अहिल्या, द्रौपदी, कुंती, तारा आणि मंदोदरी या पाचही स्त्रियांचं चरित्र विचारात घेतलं असता पुढील तपशील स्पष्ट होतो. अहिल्येनं गौतम आणि देवराज इंद्र या दोन पुरुषांशी संबंध ठेवला. द्रौपदी पाच पांडवांची पत्नी होती. कुंतीनं सूर्य, यम, वायू आणि इंद्र या चार देवतांपासून पुत्रप्राप्ती करवून घेतली. मंदोदरी आधी रावण आणि त्याच्या वधानंतर राजा झालेल्या बिभीषणाशी विवाह करून लंकेची साम्राज्ञी म्हणून वावरली. तारा ही किष्किंधेची राणी आणि वानर राजा वालीची पत्नी होती. विधवा झाल्यानंतर तिनं वालीचा धाकटा भाऊ सुग्रीवाशी विवाह केला. या सर्वच स्त्रियांनी एकाहून अधिक पुरुषांशी संबंध ठेवले तरीही या पंचकाचं स्मरण केल्यानं ना (‘नृ’ चे प्रथमा एकवचन) म्हणजे पुरुषाच्या महापापांचा नाश होतो, असा तो श्लोक आहे.
काळाच्या ओघात कधीतरी या पाच स्त्रियांतील कुंतीचं नाव वगळून त्यात रावणासारख्या सर्वार्थानं बलाढ्य, यशस्वी, विद्वान पुरुषाशी संबंध ठेवण्याची संधी असूनही केवळ आणि केवळ वनवासी श्रीरामाशीच एकनिष्ठ असलेल्या सीतेचं नाव घुसडण्यात आलं. हा सीतेच्या पातिव्रत्यावर थेट अन्याय आहे तसंच ‘पंचक’ म्हणजे पाचांचा समूह. ‘पंचकं ना स्मरेन्नित्यं’ चं ‘पंचकन्या स्मरेन्नित्यं’ असा अपभ्रंश झाला. ‘कन्या’ या शब्दाचा अर्थ होतो - बालिका किंवा अविवाहित युवती, कुमारिका. या पाचही स्त्रिया विवाहित होत्या. त्यामुळे या श्लोकात ‘पंचकन्या’ हा शब्द अयोग्य आहे.
तर, अशा या स्त्री पंचकातली एक असलेली मंदोदरी. रावणाची बलदंड राजसी देहयष्टी, त्याच्या भौतिक समृद्धीचं द्योतक असलेली सोन्याची लंका, आयुर्वेदापासून संगीत आणि काव्यशास्त्रापर्यंत; युद्धशस्त्रापासून विमान उड्डयनतंत्रापर्यंत सर्वच क्षेत्रात असलेला त्याचा अधिकार, नर्मदा नदीच्या दक्षिणेच्या संपूर्ण प्रदेशावर असलेली त्याची राजसत्ता, अघोरी शिवभक्ती, त्याचा तामसी पराक्रम या सगळ्या आवेगी व्यक्तिमत्त्वाला पूरक असलेलं मंदोदरीचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे; मात्र स्वतंत्र, संयत आणि सौम्य.
तिचे पिता असुरराज मय हे मध्यभारतातल्या मंदसोर नगर राजधानी असलेल्या प्रांतावर त्यांचं राज्य होतं. मयासुरानं दोन सर्वस्वी वेगळ्या ज्ञानशाखांवर प्रभुत्व मिळवलं होतं. प्राचीन भारतात ‘सूर्यसिद्धांत’ हा खगोलशास्त्राचा अतिशय प्रगाढ ग्रंथ मयासुरानं रचला आहे. त्यात खगोलीय निरीक्षणांच्या आधारे योग्य ते बदल करण्याचं स्वातंत्र्य पुढच्या पिढ्यांच्या विद्वान खगोलशास्त्रज्ञांना देण्यात आलं आहे. त्यानुसार त्यातला एक बदल आजपासून जवळपास १२ हजार वर्षांपूर्वी केला असल्याचं सिद्ध झालेलं आहे. म्हणजे हा ग्रंथ त्याआधीपासून अस्तित्वात होता; आणि कालांतरानं बदललेल्या खगोलीय परिस्थितीनुरूप योग्य ते बदल करण्यात आले.
त्यानं रचलेला दुसरा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे ‘मयमतम्!’ भारतीय वास्तुशास्त्राचा पायाभूत शास्त्रीय ग्रंथ म्हणून याची मान्यता आजही अबाधित आहे. तमिळ भाषेत पारंपरिक वास्तुकला आणि शिल्पशास्त्राचा मूळ प्रवर्तक म्हणून ‘मयन’ या नावानं त्यांचं पूजन करतात. त्यांना ‘मयनर’ आणि ‘मयमुनी’ असंही संबोधन आहे. पांडवांसाठी मयसभा निर्माण करणारे म्हणून मयासुराचं नाव महाभारतातदेखील येतं. मयासुराचा विवाह हेमा नावाच्या स्वर्गीच्या अप्सरेशी झाला.dr rama golwalkar त्यातून मायावी आणि दुंदुभी हे दोन पुत्र तशाच मंदोदरी आणि धन्यमालिनी या दोन कन्या जन्मल्या. अशा दिग्गज माता-पित्याची मुलगी म्हणून मंदोदरीचं संगोपन किती उच्च अभिरुची आणि सकलविद्या - कलांनी प्रचुर अशा वातावरणात झालं असावं, याची कल्पना करता येऊ शकते.
मंदोदरीचा शब्दश: अर्थ आहे - जिचं उदर म्हणजे पोट अतिशय सडपातळ आहे अशी. म्हणजेच कमनीय कटी असलेली. त्यातून तिच्या शारीरिक सौंदर्याचं वैशिष्ट्य स्पष्ट होतं. अप्रतिम लावण्यासोबतच ती तिच्या नैतिक आणि बौद्धिक संपन्नतेकरिता सर्वत्र प्रसिद्ध होती. परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेऊन त्यावर यथायोग्य निर्णय घेण्याची तिची क्षमता आणि स्पष्टवक्ता स्वभाव यामुळे ती रावणाला अधर्मी आचरण न करण्याविषयी वेळोवेळी सल्ला देते.
रावणापासून मंदोदरीला मेघनाद उपाख्य इंद्रजीत, अक्षयकुमार, अतिकाया असे तीन अतिशय पराक्रमी पुत्र झालेत. हे तिघेही राम-रावण युद्धात धारातीर्थी पडले. रावणाच्या मृत्यूची वार्ता ऐकून मंदोदरी रणभूमीवर येते. पतीच्या निधनाविषयी शोक व्यक्त करताना तिचे उद्गार वाल्मीकि रामायणात येतात. त्यातल्या काही श्लोकांचं शब्दश: भाषांतर आहे -
‘जन्स्थानात राक्षस सेनेनं वेढलेल्या खराचा वध रामानं केल्याचं ऐकल्यानंतरच तो कोणी साधा मानव नाही हे कळलं होतं. हनुमंत ज्यावेळी लंकेत शिरला आणि त्यानं आपला प्रताप दाखवला त्यावेळीदेखील आपण अस्वस्थ झालो होतो. रामाशी कोणतेही वैर ओढावून घेऊ नका, हा माझा सल्ला तुम्ही ऐकला नाही. त्यामुळेच तुमच्यावर ही वाईट वेळ आलेली आहे. हे राक्षसपुंगवा, संपत्ती, शरीर आणि आप्तजन यांच्या विनाशासाठीच तुला अचानक सीतेविषयी आसक्ती निर्माण झाली. हे दुष्टमति, अरुंधती (ब्रह्मर्षी वसिष्ठ पत्नी) आणि रोहिणी (चंद्रपत्नी) यांच्यासारखीच (साध्वी) असलेल्या सीतेला बलपूर्वक पळवून आणलंस, हे तिच्यावर अन्यायकारकच होतं. पापी कृत्याचं फळ असंच भयंकर असतं. शुभ कर्माची फळं नेहमीच शुभ असतात. बिभीषण त्याच्या सत्कृत्याचे आणि तू तुझ्या दुष्कृत्याचे परिणाम भोगतो आहेस.’
आयुष्यभर रावणाला परोपरीनं भरभरून साथ दिली तरी सीतेवर झालेल्या अन्यायाचा तिनं वेळोवेळी निषेधच केला. रावणा, तू चुकलास हे पदोपदी सांगितलं. रावणासारख्यांच्या अनैतिक कृत्याचा कडाडून विरोध करणाऱ्या महाराणी मंदोदरीची ही आठव कथा.
नागपूर/९४२२११४६२०