काठमांडू,
23 bodies found in a single house in Nepal नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे झालेल्या विध्वंसाचे चित्र दिवसेंदिवस अधिक भयावह होत आहे. पुरातील मृतांचा आकडा आता ९६२ वर पोहोचला असून, ४,००० हून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान, सर्वाधिक प्रभावित नुवाकोट जिल्ह्यातील विदूर नगरपालिकेतील बेटावती गावात ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या तीन मजली घरातून २३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हे मृतदेह गोसाईकुंडच्या दिशेने निघालेल्या यात्रेकरूंचे असावेत, असा पोलिसांचा संशय आहे.२६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे हे घर पुराच्या पाण्यात बुडाले होते. बचाव पथकाने घराची झडती घेतली असता एका खोलीतून २१ आणि घराबाहेरून आणखी दोन मृतदेह आढळले. पुराचे पाणी वाढल्यानंतर जीव वाचवण्यासाठी काही जण घराच्या वरच्या मजल्यावर गेले असावेत आणि त्यानंतर संपूर्ण गट पुराच्या प्रवाहात अडकला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतदेहांसोबत काही पिशव्याही आढळल्या असून, त्यामुळे ते यात्रेकरू असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नुवाकोटचे पोलीस अधीक्षक विपिन रेग्मी यांनी सांगितले की, सापडलेल्या मृतदेहांपैकी एक परदेशी नागरिकाचा असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येते. छताच्या अगदी खालील खोलीत मृतदेह आढळले. याच ठिकाणी एका महिलेच्या मांडीवर लहान मूल घट्ट धरून ठेवलेल्या अवस्थेत आढळले. हे दोघे आई आणि मुलगी असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. आतापर्यंत बाहेर काढलेल्या २३ मृतदेहांपैकी आठ मृतदेह त्रिशुली रुग्णालयात हलवण्यात आले असून, उर्वरित मृतदेह घराच्या छतावर आहेत आणि तेही लवकरच हलवले जाणार आहेत.
दरम्यान, रसुवा जिल्ह्यातील उत्तरगया गावात सुमारे ३५० विद्यार्थी बेपत्ता असल्याची माहिती असून, त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्रिशुली ३ए जलविद्युत प्रकल्पातील बचावमोहीम सलग सहाव्या दिवशीही थांबलेली आहे. या प्रकल्पात कार्यरत असलेल्या अंदाजे ४० ते ४२ अभियंत्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर त्रिशुली ३बी जलविद्युत प्रकल्पातील ११८ कर्मचाऱ्यांशी संपर्क होऊ शकलेला नाही.नेपाळमधील बचावकार्यात भारतीय पथकांनीही मदत वाढवली आहे. भारतीय तज्ज्ञ पथक नेपाळी लष्कराच्या सहकार्याने प्रतिकूल हवामान आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीत बचावकार्य करत आहे. रसुवा जिल्ह्यातील चिलिमे आणि लांगटांग येथील बोगद्यांमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत भारतीय बचाव पथकांना प्राथमिक यश मिळाले आहे. त्यामुळे बेपत्ता नागरिक आणि अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य अधिक वेगाने सुरू आहे.