अंजनगाव सुर्जी
ban on djs and laser lights आगामी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत पार पाडण्यासाठी गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे. गणेशोत्सवात डीजे, लेझर लाईटवर बंदी असून फक्त दोनपेक्षा अधिक टॉप व दोन बॉक्स वापरण्यास मुभा आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी दिला आहे.
गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर आयोजित शांतता समिती व गणेश मंडळांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी आमदार गजानन लवटे, माजी आमदार रमेश बुंदिले, नगराध्यक्ष अविनाश गायगोले, उपनगराध्यक्ष प्रियांका मालठाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील हुड, पोलिस निरीक्षक सूरज बोंडे, पथ्रोट पोलिस ठाण्याचे ठाणेदार, चिंचोली रहिमापूरचे ठाणेदार, महसूल विभागाचे अन्नधान्य पुरवठा निरीक्षक रणजित रामागडे, पत्रकार, गणेश मंडळांचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे देखावे, गाणी किंवा सोशल मीडियावर पोस्ट प्रसारित करू नयेत. व्हॉट्सॲपसह सोशल मीडियावर आलेले आक्षेपार्ह व्हिडिओ अथवा संदेश स्वतःहून व्हायरल न करता त्याची सत्यता तपासावी. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे कदम यांनी स्पष्ट केले. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून गरजेनुसार तडीपारीची कारवाई करण्यात येईल. यापूर्वी २५८ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील न्यायालयीन आदेशांचे काटेकोर पालन करावे. डीजे आणि लेझर लाईटचा वापर टाळून ढोल-ताशे, लेझीम आणि पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. डीजे ही आपली संस्कृती नाही, गणेशोत्सव डीजेमुक्त करा, असे पत्रकार अशोक पिंजरकर यांनीही यावेळी मत व्यक्त केले.