करपलेल्या पिकांचे थेट शेतात जाऊन सर्वेक्षण

शेतकऱ्यांना भरपाईचा मार्ग मोकळा

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
मुंबई
crop damage दुष्काळसदृश परिस्थिती आणि पावसाने दडी मारल्यामुळे उभी पिके करपून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ज्या-ज्या भागात पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी थेट शेतात जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आणि मुख्य सचिवांना दिले आहेत. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
 

drought-hit farmers to get relief: maharashtra government orders crop damage survey for compensation 
चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली. ज्या भागात पावसाने दडी मारल्याने पिके करपली आहेत, तेथील नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बळीराजाला नियमानुसार आवश्यक ती नुकसानभरपाई देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
या सर्वेक्षणाची जबाबदारी महसूल, कृषी आणि ग्रामविकास या तीन विभागांवर सोपवण्यात आली आहे. तिन्ही विभागांच्या समन्वयातून प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली जाणार आहे. संपूर्ण सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मराठवाड्यात सुरू असलेल्या प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेवरही बावनकुळे यांनी भाष्य केले. प्रमाणपत्र वितरणासाठी यापूर्वीही शिबिरे आयोजित करण्यात आली होती आणि त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला होता. शासनाने यापूर्वीही जात प्रमाणपत्रांचे वितरण केले असून, अस्तित्वात असलेल्या नियमावलीनुसार शिबिरे आयोजित करणे हे शासनाचे धोरणच असल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसींच्या मागण्यांबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, संबंधितांनी माध्यमांमध्ये मागण्या मांडल्या असतील; मात्र त्यांच्या मागण्या अद्याप शासनाकडे अधिकृतपणे आलेल्या नाहीत. मागण्या शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या समितीसमोर मांडून त्यावर विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजस्थानमधील निवडणुकांबाबतही बावनकुळे यांनी विश्वास व्यक्त केला. राजस्थानमध्ये दहा महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या असून, तेथे आपण प्रभारी होतो, असे त्यांनी सांगितले. राजस्थानमधील दहाही महानगरपालिकांमध्ये विजय मिळवू, असा दावा त्यांनी केला. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये आतापर्यंत मिळालेल्या यशापेक्षा मोठा विजय १४ तारखेला पाहायला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.