अनिल कांबळे
नागपूर,
nagpur crime बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या भोपाळ एटीएसच्या पथकाने बुधवारी नागपुरात कारवाई करीत जॉय चौधरी या बांगलादेशी नागरिकाला अटक केली. यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रवेशनगर परिसरातील एका धार्मिक स्थळी ओळख लपवून राहत असल्याचे तपासात समोर आले. अटकेनंतर एटीएसचे पथक त्याला पुढील तपासासाठी ग्वालियरला घेऊन गेले. या प्रकरणात जॉय चौधरीसह सुमारे २० बांगलादेशी नागरिकांविरुद्ध ग्वालियर येथे जवळपास दोन वर्षांपूर्वी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाच्या तपासादरम्यान चौधरी नागपुरात लपून राहत असल्याची माहिती भोपाळ एटीएसला मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जॉय चौधरी मागील तीन ते चार महिन्यांपासून नागपुरात राहत होता. यशोधरानगरच्या प्रवेशनगर परिसरातील एका धार्मिक स्थळी त्याने आपली खरी ओळख लपवून ठेवली होती. चौधरी नागपुरात असल्याची माहिती मिळताच भोपाळ एटीएसने नागपूर एटीएसशी संपर्क साधला. त्यानंतर यशोधरानगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने एटीएस पथकाने प्रवेशनगर येथून चौधरीला ताब्यात घेतले.
बनावट पासपोर्ट तयार
चौधरीने दोन वर्षांपूर्वी गुजरातमधील बडोदरा येथे बनावट पासपोर्ट तयार करून त्याच्या आधारे मध्य प्रदेशात पोहोचल्याचे सांगितले. या प्रकरणातील त्याच्या काही साथीदारांना भोपाळ एटीएसने यापूर्वीच अटक केली आहे. ग्वालियर पोलिस ठाण्यात १ मे २०२४ रोजी आरोपींविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि त्यांचा वापर करणे यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नागपुरातील आश्रयदात्यांचाही शोध
भोपाळ एटीएसला चौधरी नागपुरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने नागपुरात येऊन कारवाई केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी ग्वालियरला नेण्यात आले आहे. दरम्यान, चौधरीने बनावट कागदपत्रे कोणाच्या मदतीने तयार करून घेतली, भारतात आल्यानंतर त्याच्या हालचाली काय होत्या आणि नागपुरात त्याला आश्रय देणाऱ्यांची भूमिका काय होती, याचा तपास एटीएस आणि पोलिसांकडून करण्यात येत आहे.