मकोका प्रकरणातील फरार आरोपी इच्छू अखेर अटकेत

मित्राच्या घरात लपून राहत होता; वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
mcoca case पाचपावली पोलिस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यात मकोकासह विविध कलमांखाली वांटेड असलेल्या आरोपीला तहसील पोलिसांच्या डीबी पथकाने अखेर अटक केली. मोहम्मद इरशाद खान मोहम्मद ऊर्फ इच्छू वल्द पीर मोहम्मद (३८, रा. डोबीनगर, दम्मदार दरबारजवळ, तहसील) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मागील वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत ठिकाणे बदलून राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छू हा त्याचा मित्र शकील मोहम्मद याच्या घरी लपून राहत असल्याची गोपनीय माहिती तहसील पोलिसांच्या डीबी पथकाला मिळाली. बुधवारी रात्री माहिती मिळताच पथकाने तकिया परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. तो पसार होण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली.
 
 
 
प्रभारी उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. डिसेंबर २०२५ मध्ये पाचपावली पोलिस ठाण्यात इच्छूविरुद्ध मकोका तसेच इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तो मोमिनपुरा येथील इप्पा गँगच्या प्रमुखाचा भाऊ असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. आरोपीविरुद्ध पाचपावली पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र कायदा, महाराष्ट्र पोलिस अधिनियम, शस्त्र अधिनियम, एनडीपीएस कायदा तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी तहसील पोलिस ठाण्यात आणण्यात आले.