नवी दिल्ली,
delhi high court भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. १४ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी तिने मागितलेला अंतरिम दिलासा न्यायालयाने नाकारला. गुरुवारी रात्री न्यायमूर्ती स्वर्ण कांत शर्मा यांनी विनेशची याचिका फेटाळून लावत चाचण्यांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग बंद केला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये पुनरागमन करण्याच्या तिच्या प्रयत्नांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे.७ सप्टेंबर २०२६ रोजी भारतीय कुस्ती महासंघाने वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचण्यांसाठी परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकात पात्रतेसाठी काही विशिष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत. निर्धारित स्पर्धांमध्ये पदक मिळवलेले खेळाडू, राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी झालेले खेळाडू तसेच २०२६च्या २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू पात्र ठरणार आहेत. विनेशने या चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

विनेशने न्यायालयात आपली बाजू मांडताना गर्भधारणा, प्रसूती आणि त्यानंतरच्या आरोग्यविषयक परिस्थितीमुळे काही निर्धारित स्पर्धांमध्ये सहभागी होता आले नसल्याचे सांगितले. तसेच भारतीय कुस्ती महासंघाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यानंतर तिला गोंडा येथील वरिष्ठ खुल्या क्रमवारी स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखण्यात आल्याचा दावाही तिने केला. मात्र, न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे नवीन पात्रता निकष सर्व खेळाडूंना समानपणे लागू होत असल्याचे स्पष्ट केले. हे नियम विशेषतः विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यासाठी तयार करण्यात आलेले नाहीत, असेही न्यायालयाने नमूद केले.
दरम्यान, यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने मे महिन्यात विनेशला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती. त्या चाचण्यांदरम्यान कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी विनेशला बजावण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस अद्याप प्रलंबित आहे. आता नव्या पात्रता निकषांनुसार तिला १४ सप्टेंबरच्या वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होता येणार नसल्याने तिच्या पुनरागमनाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.