हैदराबाद,
sir notice issued to mahesh babu तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावे नोटीस यादीत आल्याने चर्चेला उधाण आले आहे. निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेंतर्गत अभिनेता महेश बाबू, चित्रपट दिग्दर्शक एस. एस. राजामौली, माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्यासह चित्रपट, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या यादीत महेश बाबू यांच्यासह त्यांची पत्नी नम्रता, एस. एस. राजामौली, व्यंकटेश डग्गुबाटी आणि त्यांच्या मुली, सामंथा रुथ प्रभू, विजय देवराकोंडा, आनंद देवराकोंडा, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, मिताली राज, पुलेला गोपीचंद, सायना नेहवाल, मुरली कृष्ण प्रसाद दिवी आणि उपासना कोंडीडेला यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे एसआयआर नोटिसांची ही यादी केवळ मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींपुरती मर्यादित नसून क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींची नावेही त्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मतदार याद्या अद्ययावत आणि अचूक करण्यासाठी ही छाननी प्रक्रिया राबवली जात असल्याचे वृत्त आहे. काही प्रकरणांमध्ये मतदारांच्या नावात किंवा त्यांच्या पालकांच्या नावात त्रुटी आढळल्या आहेत. काही नोंदी जुन्या एसआयआरच्या माहितीशी जुळत नसल्याचेही समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये मात्र नोटीस पाठवण्यामागचे विशिष्ट कारण नमूद करण्यात आलेले नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधितांना पडताळणी करून आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची संधी दिली आहे. नावातील चुका असल्यास त्या दुरुस्त करता येणार आहेत. सुनावणीसाठी स्वतः उपस्थित राहणे शक्य नसल्यास संबंधित व्यक्ती आपल्या वतीने दुसऱ्या व्यक्तीला अधिकृत करू शकते.
दरम्यान, एसआयआरची नोटीस मिळणे म्हणजे संबंधित व्यक्ती मतदानासाठी अपात्र ठरली किंवा तिचे मतदार म्हणून नाव रद्द झाले, असा अर्थ होत नाही. मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील नोंदींची पडताळणी आणि आवश्यक दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेचाच हा एक भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.