चॅम्पियन झाली तरी रिकाम्या हाताने परतणार टीम इंडिया ?

ट्रॉफी-पैशांबाबत धक्कादायक माहिती समोर

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
team india महिला आशिया कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दिमाखात प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा तब्बल 40 धावांनी पराभव करत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. या विजयानंतर आता भारतीय चाहत्यांच्या नजरा अंतिम सामन्याकडे लागल्या आहेत. टीम इंडिया यंदाचा आशिया कप जिंकून जेतेपदावर नाव कोरणार का, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी समोर आलेली एक बाब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
 
team india
 
टीम इंडियाने महिला आशिया कप जिंकला तरी विजेतेपदाची बक्षिसाची रक्कम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) येणार नाही. बीसीसीआय आशिया कपमधून मिळणारी विजेतेपदाची रक्कम स्वतःकडे ठेवत नसल्याचं या माहितीत सांगण्यात आलं आहे. आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपद पटकावल्यास मिळणारी बक्षिसाची रक्कम इतर क्रिकेट बोर्डांच्या विकासासाठी दिली जाते. त्यामुळे भारताने मैदानावर जेतेपद पटकावलं तरी त्या विजयाची आर्थिक रक्कम टीम इंडियाला किंवा बीसीसीआयला मिळणार नाही.
 
ट्रॉफीबाबतही निर्माण झाला प्रश्न
फक्त बक्षिसाची रक्कमच नाही, तर महिला आशिया कपची ट्रॉफी भारतीय संघ स्वीकारणार का, याबाबतही सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. रिपोर्ट्सनुसार, आशिया कपच्या ट्रॉफी वितरणासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी दुबईत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताने अंतिम सामना जिंकला, तर ट्रॉफी स्वीकारण्याबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
पुरुष आशिया कपमध्येही भारताने ट्रॉफी घेतली नव्हती
यापूर्वी पुरुषांच्या आशिया कपमध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला होता. मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिला होता. त्यामुळे आता महिला संघासमोरही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी तणावपूर्ण झाले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने मोहसिन नक्वी तसेच पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला होता. मोहसिन नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असण्यासोबतच पाकिस्तानचे गृहमंत्रीही आहेत. भारताविरोधात त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळेही त्यांच्यावर भारतात मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे.
 
महिला टीमही ट्रॉफी स्वीकारणार नाही?
आता महिला आशिया कपच्या अंतिम सामन्यात जर भारताने बाजी मारली, तर ट्रॉफी वितरणावेळी नेमकं काय घडणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आल्यास भारतीय महिला संघ ती स्वीकारणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अंतिम सामन्यातील निकालाइतकंच ट्रॉफी वितरणाचं दृश्यही चर्चेचा विषय ठरू शकतं.