अर्जुनी मोरगाव,
Chital killed अज्ञात वाहनाच्या धडकेत एका नर चितळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास तावशी-संभाजीनगर महामार्गावर घडली. या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मृत चितळ महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाची धडक बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. धडक एवढी जोरदार होती की, चितळाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या परिसरात वन्यप्राण्यांची वर्दळ असल्याने रस्त्यावरून ये-जा करणार्या वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

महामार्गावर वाहनांची वाढती वर्दळ आणि वाहनांचा वेग लक्षात घेता वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींकडून होत आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घटनेचा तपास वनपरिक्षेत्राधिकारी बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक परशुरामकर, सतीश शेंदरे, रविंद्र सांदेवार तसेच वनमजूर दिलीप डोंगरवार करीत आहेत. दरम्यान, चितळाला धडक देणारे वाहन कोणते होते, अपघात नेमका कशा परिस्थितीत घडला, याचा शोध वनविभागाकडून घेतला जात आहे. रस्ते आणि महामार्ग वनक्षेत्राजवळून जात असल्याने वन्यप्राणी अनेकदा रस्ता ओलांडताना दिसून येतात. अशावेळी भरधाव वाहनांमुळे वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा संवेदनशील मार्गांवर वेगमर्यादा, वन्यप्राणी मार्गाचे फलक, वाहनचालकांना सावधानतेच्या सूचना तसेच आवश्यक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त केले जात आहेत.