निवृत्त मुख्याध्यापकाच्या घरी लाखोंची घरफोडी

- २५ तोळे सोने, चांदी आणि रोकड लंपास

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
burglary इमामवाडाच्या उंटखाना परिसरात चोरट्यांनी एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे घर फोडून तब्बल २५ तोळे सोन्याचे दागिन्यांसह रोख असा १४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या प्रकरणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मिलिंद कांबळे (६५, रा. उंटखाना) यांच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
 
burglary
 
 
मिलिंद कांबळे हे शाळेच्या मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा व सून हे दोघेही प्राध्यापक आहेत. घटनेच्या एक दिवस आधी कांबळे कुटुंबातील सदस्य चंद्रपूर येथे गेले होते. कांबळे यांच्या पत्नीही विपश्यनेसाठी बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे घर काही काळ पूर्णपणे बंद होते. हीच संधी साधून चोरट्याने कांबळे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटांची झडती घेत त्याने २५ तोळे सोन्याचे दागिने, ४० ग्रॅम चांदी आणि ७५ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. दुसऱ्या दिवशी सकाळी कांबळे यांच्या घरी काम करणारी महिला आली असता तिला मुख्य दरवाजा उघडा दिसला. घरफोडी झाल्याचे लक्षात येताच तिने कांबळे यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर कांबळे चंद्रपूरहून नागपुरात परतले. घरातील दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरांचा शोध
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक, अंगुलीमुद्रा पथक आणि न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे नमुने घेतले. वपोनि जयवंत पाटील यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, पोलिसांनी घरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. चोरट्याच्या हालचाली आणि येण्या-जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी तांत्रिक तपास केला जात असून, खबऱ्यांच्या माध्यमातूनही त्याचा शोध घेण्यात येत आहे.
बंद घरांवर चोरट्यांची नजर
उंटखान्यातील या घटनेमुळे बंद घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कुटुंबातील सर्व सदस्य बाहेरगावी गेल्याची माहिती मिळाल्यानंतरच चोरट्याने घराला लक्ष्य केले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी घर काही दिवसांसाठी बंद ठेवताना शेजारी किंवा विश्वासू व्यक्तीला याची माहिती द्यावी.burglary तसेच घरात सीसीटीव्ही व अन्य सुरक्षा व्यवस्था करून परिसरातील संशयास्पद हालचालींकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे