गणपती आरतीतील अंकिता लोखंडेच्या वागण्याची पुन्हा चर्चा

मंत्रपुष्पांजली म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
मुंबई
ankita lokhande गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटींच्या घरातील गणपती दर्शन, आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. टेलिव्हिजन अभिनेता अर्जुन बिजलानीच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या गणपती आरतीला मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हेही या सोहळ्यात सहभागी झाले होते. दरम्यान, या कार्यक्रमातील अंकिताच्या वागण्याचे काही व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिच्याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
 

ankita lokhande ganpati aarti video goes viral, social media reacts to her 
आता समोर आलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये अंकिता मंत्रपुष्पांजली म्हणताना दिसत आहे. सुरुवातीला ती उत्साहाने मंत्र म्हणताना दिसते. मात्र, पुढील ओळ म्हणण्याची वेळ येताच ती अचानक थांबते. शब्द आठवत नसल्यासारखा तिचा अंदाज या व्हिडीओमध्ये दिसून येतो. त्याचवेळी अर्जुन बिजलानी तिच्याकडे पाहून हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
काही सोशल मीडिया युजर्सनी अंकिताच्या या वागण्याला ‘अतिउत्साह’ असे म्हटले आहे. तर काहींनी आरतीच्या वेळी अशा प्रकारचे वर्तन करण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आरतीचा असा तमाशा का?’ आणि ‘ही वेडी झालीये का?’ अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया काही युजर्सनी व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी व्हायरल झालेल्या अंकिताच्या व्हिडीओवरही काही नेटकऱ्यांनी ‘अंकिताला झालंय तरी काय?’ तसेच ‘ती ठीक आहे का?’ असे प्रश्न उपस्थित केले होते.
अर्जुन बिजलानीच्या घरी झालेल्या यापूर्वीच्या गणपती आरतीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर चर्चेत आला होता. या व्हिडीओमध्ये अंकिता आरतीदरम्यान उत्साहात डुलताना, विविध हावभाव करताना आणि त्यानंतर नाचताना दिसली होती. तिच्या या उत्साहाचे काही चाहत्यांनी कौतुक केले होते. मात्र, काही नेटकऱ्यांनी तिच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
गणपती उत्सवानिमित्त अर्जुन बिजलानीच्या घरी मनोरंजन विश्वातील अनेक टीव्ही कलाकार एकत्र आले होते. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनीही या कार्यक्रमात सहभागी होत बाप्पाचे दर्शन घेतले. या सोहळ्यातील कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ पापराझी तसेच विविध सोशल मीडिया अकाउंट्सवरून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले.
दरम्यान, मंत्रपुष्पांजली म्हणतानाचा अंकिताचा नवा व्हिडीओ समोर आल्याने तिच्या वागण्याची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडीओवरून तिच्या चाहत्यांसह सोशल मीडिया युजर्सचे लक्ष पुन्हा तिच्या या कृतीकडे वेधले गेले आहे.