अकोला
akola encroachment drive शहरातील नो हॉकर्स झोन निश्चित केलेल्या रस्त्यांवर अतिक्रमण काढण्यासंदर्भात स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी ९ सप्टेंबर रोजी झालेल्या सभेत निर्देश दिल्यानंतर सुद्धा या ठिकाणची अतिक्रमण काढण्यात आली नसल्याने सभापती अग्रवाल यांनी अतिक्रमण विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.सोमवारपासून अतिक्रमण मोहीम तीव्र करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी बैठकीत दिले.
मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी गुरुवार, १७ रोजी आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या उपस्थितीत शहरात वाढत असलेल्या अतिक्रमणाबाबत विभागाची आढावा बैठक घेतली.यावेळी सभापती अग्रवाल यांनी, गेल्या सभेत काश्मीर लॉज समोरील रस्त्यावरील अतिक्रमण काढणे व शहरातील नो हॉकर्स झोन येथील अतिक्रमण पूर्णपणे काढणे संदर्भात, झोन मधील अतिक्रमणांची कारवाई करणे, नो हॉकर्स झोन येथे अतिक्रमणाच्या कार्यवाहीसाठी दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत पथके कार्यान्वीत ठेवणे आदींबाबत सुचना दिली होत्या,परंतू अतिक्रमणे जैसे थे परिस्थितीत असल्याने सभापती अग्रवाल यांनी अतिक्रमण विभागाच्या कामावर नाराजी व्यक्त केली.तसेच सोमवार पासून नो हॉकर्स झोन अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवर अतिक्रमणे आढळून आल्यास संबंधीतांवर कडक कारवाई करण्याचे संकेत यावेळी सभापती अग्रवाल यांनी दिले.
ताकीद नंतर अतिक्रमण नष्ट करण्याच्या सूचना
नो- हॉकर्स झोन अंतर्गत येणा-या सर्व रस्त्यांवर फलक लावणे, अतिक्रमणे हटविण्यासाठी घोषणा करणे, ताकीद दिल्यानंतर अतिक्रण धारक जर अतिक्रमणे हटवत नसेल तर ते जागीच नष्ट करणे याबाबत मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी सूचना दिल्या.बैठकीत मनपा सहाआयुक्त गणेश शहाणे, मनपा उपायुक्त विजय पारतवार, मनपा शहर अभियंता अजय गुजर, सहा.अतिक्रमण निर्मुलन अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, शहर प्रकल्प अधिकारी प्रमोद गायकवाड यांचेसह अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.