सव्वा चार लाखांचा ५९३ किलो मुदतबाह्य तूप साठा जप्त

दोन नामांकित दुकानांचे परवाने निलंबित

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
अकोला
akola fda action अन्न औषध प्रशासन विभागाने शहरातील खाद्य आस्थापनांची दोन दिवसीय विशेष तपासणी मोहीम राबवून शहरातील पूर्वा मार्केटिंग व मेसर्स लिलाधर जगजीवन या नामांकित दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेला तब्बल ५९३ किलो ४ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुदतबाह्य तुपाचा साठा जप्त केला असून दोन्ही आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.
 

akola fda action 593 kg expired ghee worth rs 4.15 lakh seized, two licences suspended 
एफडीएचे सहआयुक्त दे. गो. वीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ आणि १७ सप्टेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शहरातील विविध खाद्य प्रतिष्ठानांची तपासणी केली. त्यात पूर्वा मार्केटिंग येथील तपासणीत येथे १५ वेगवेगळ्या प्रकारच्या कालबाह्य तुपाचा साठा आढळून आला. प्रशासनाने ४५८ किलो तूप जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत ३ लाख ३४ हजार ९३ रुपये आहे.मेसर्स लीलाधर जगजीवन येथे १७ सप्टेंबर रोजी छापा टाकण्यात आला. येथे वटुला प्रीमियम घी या ब्रँडचा मुदतबाह्य साठा विक्रीसाठी ठेवलेला आढळला. पथकाने येथील १३५ किलो तूप जप्त केले असून त्याची किंमत ८१ हजार रुपये आहे.
ही धडक कारवाई अमरावती विभागाचे सह आयुक्त अन्न एस.डी.केदारे, अकोला सहाय्यक आयुक्त अन्न डी. जी. वीर यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी आर. डी. सोळंके व कि. ह. बोरचाटे यांच्या पथकाने केली.
भेसळखोरांची गय नाही
अन्न औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यात भेसळखोरांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.त्यानुसार अकोल्यातील अन्न औषध प्रशासन विभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चोहट्टा बाजार येथील दूध डेअरी, जठार पेठ चौकातील स्वीट मार्ट, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपपहारगृह, एमआयडीसी परिसरात सोयाबीन तेलाचा साठा यासह आता मुदतबाह्य तुपाचा साठा देखील जप्त केला आहे. या कारवाईने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
शाळांच्या परिसरात जंकफूडची सर्रास विक्री
विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस आणि पोषणमूल्यांनी समृद्ध आहार मिळावा, यासाठी 'सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र' ही राज्यव्यापी मोहीम राबविण्याचे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.या अंतर्गत शाळांच्या ५० मीटर परिघात जंक फूडवर बंदी आणण्यात आली आहे. याबाबत मुख्याध्यापकांची कार्यशाळा देखील पार पडली.तरीही शहरात शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात जंक फूडची विक्री होत असल्याचे चित्र असताना आता एफडीए चा मोर्चा या परिसराकडे केव्हा वळतो याकडे लक्ष लागले आहे.