जगन्नाथ मंदिराकडे अब्जावधींचा निधी!

दररोज मोजली जाते हुंडी, सोशल मीडियावर रोज जाहीर होतो हिशोब

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
पुरी,
Jagannath Temple's Abjavadhincha Fund ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या अफाट उत्पन्नाचा आणि मंदिराकडे जमा असलेल्या निधीचा एक सविस्तर अहवाल समोर आला आहे. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या मुदत ठेवी (FD) आणि बँक खात्यांमधील शिल्लक रक्कमेतून मंदिराच्या भक्कम आर्थिक स्थितीचे चित्र स्पष्ट होत आहे. भाविकांनी अर्पण केलेल्या देणग्या, जमिनींची खरेदी-विक्री, खाणींपासून मिळणारे उत्पन्न, एफडीवरील व्याज आणि सरकारी अनुदानाच्या माध्यमातून मंदिराला हे उत्पन्न मिळते. 
 

puri 
 
श्री जगन्नाथ मंदिर कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मंदिराच्या तीन प्रमुख निधींपैकी तब्बल १,८११ कोटी ९ लाख ५८ हजार २८३ रुपये हे विविध बँकांमध्ये मुदत ठेवी म्हणून सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. यातील १,३११ कोटी ९ लाख ५८ हजार २८३ रुपयांची रक्कम ही विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जमा आहे, तर ओडिशा सरकारने दिलेला ५०० कोटी रुपयांचा मुख्य कॉर्पस निधी हा मंदिराच्या पीएल खात्यात जमा करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, मंदिराचा दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी बचत, चालू आणि फ्लेक्सी बँक खात्यांमध्ये सुमारे १०० कोटी ७० लाख ६६ हजार ८६८ रुपयांची रोख रक्कम जमा आहे.
 
 
मंदिरातील आर्थिक व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. मंदिरात असणाऱ्या हुंडीमध्ये दररोज जमा होणाऱ्या देणग्यांची नियमितपणे मोजणी केली जाते. ही माहिती सर्वसामान्य जनता आणि भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी रोजच्या रोज ती सूचना फलकावर तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिक केली जाते. भक्तांकडून मिळणाऱ्या निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर करणे हेच प्रशासनाचे मुख्य ध्येय असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.